आज उसळणार नामांकन दाखल करण्यासाठी ढोलताशांच्या गजरात गर्दी
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली असून सोमवार दि. १७ नोव्हेंबर नामांकन प्रक्रियेचा अखेरचा दिवस असल्याने उद्या इच्छुकांची चांगलीच गर्दी होणार आहे. भंडारा, तुमसर, साकोलीसेंदुरवाफा व पवनी नगरपरिषद निवडणुकीसाठी नामांकन प्रक्रिया दि. १० नोव्हेंबरपासून सुुरु झाली आहे. उद्या दि. १७ नोव्हेंबर शेवटचा दिवस आहे. त्यानंतरच खरी रंगत वाढणार आहे. सध्या थंडीत शहरी भागातील राजकारण मात्र चांगलेच तापलेले आहे.
आज रविवार सुट्टीचा दिवस असतांनाही राज्य निवडणुक आयोगाने नामांकन स्विकारण्याचा निर्णय घेतला. पूर्वी रविवारला सुट्टी असल्याने अनेकांनी सोमवारलाच नामांकन दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. तसीच तयारी सुद्धा करण्यात आली. राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची सुद्धा घोषणा केली नाही. त्यामुळे शेवटच्या दिवशी म्हणजेच सोमवारला नामांकन दाखल करण्यासाठी मोठी गर्दी उसळणार आहे. प्रशासनातील अधिकारी आणिकर्मचाऱ्यांवरही कामाचा अधिक ताण पडणार आहे.
भंडाऱ्यात काँग्रेसने नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची घोषणा केली. मात्र इतर तीन ठिकाणच्या नावांची घोषणा केलेली नाही. अन्य पक्ष सुद्धा आपल्या उमेदवारांची आज घोषणा करतील, अशी अपेक्षा होती. मात्र सायंकाळपर्यंत एकाही पक्षाने आपल्या उमेदवारांची घोषणा केली नाही.नामांकन दाखल करण्याला फक्त एक दिवस असतांना उमेदवारांची घोषणा करण्यात आली नसल्याने उमेदवरांची “धकधक’ वाढली आहे. आज रात्री सर्व उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच उमेदवार आपले नामांकन दाखल करणार आहेत. यादी घोषित होताच रुसवे फुगवे समोर येणार आहेत.









