मराठी फॅशन वीक मध्ये भंडाऱ्याची टसर सिल्क साडी झळकली
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- अंधेरी पश्चिम मुंबई येथे आयोजित मराठी फॅशन विक २०२५ चे उद्घाटन झाले. महाराष्ट्राच्या परंपरेतून वारशाच्या धाग्यातून आणि नव्या विचारांच्या रंगातून विणलेला एक सुंदर उत्सव असं वर्णन असलेल्या या फॅशन शोमध्ये मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव येथील गोपीचंद निनावे यांची हात मागावर विणलेली सिल्कची करवत साडी सादर केली.
या फॅशन वीक मध्ये विविध वस्त्र प्रावरण सादर करण्यात आले. त्यामध्ये विविध मॉडेल्सनी घातलेल्या वेशभूषेमध्ये ग्रीष्मा हँडलूम्स गोपीचंद निनावे यांनी हातावर तयार केलेली टसरसिल्कची ची करवती साडी छाप पाडून गेली. या फॅशन शोमध्ये सुरुवातीस झालेल्या सादरीकरणामध्ये या साडीचा समावेश होता त्यानंतरकापसे पैठणी चे सादरीकरण झाले. महाराष्ट्रातील विविध वेशभूषेचे सादरीकरण केले.
यामध्ये मराठी कलावंत शो स्टॉपर होते. आंधळगाव येथील निनावे यांच्याकडे उत्पादन होणारी टसर सिल्क करवत साडी ही हात मागावर विणण्यात येते. ती साडी बनवायला साधारणता दहा ते बारा दिवस लागतात. ग्रीष्मा हँडलूम द्वारे अनेक महिला व पुरुषांना निनावे यांच्याकडील युनिटमध्ये रोजगार मिळाला आहे. करवती सिल्क साडी हे भंडाऱ्याचे उत्पादन आहे. या फॅशन शो द्वारे हातमागावरील वस्त्र निर्मितीला चालना मिळेल या हेतूने या फॅशन वीकचे आयोजन करण्यात आले.









