भाजप जिल्हा उपाध्यक्ष विकास मदनकर यांचा राजीनामा
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विकास मदनकर यांनी सोशल मिडीयावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष यांच्या नावाने पत्र लिहून जिल्हा उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यात ते म्हणाले, आपण गेली ३० वर्षे आत्मनिष्ठेने, प्रामाणिकपणे आणि पक्षाच्या तत्त्वांवर अखंड श्रद्धा ठेवून काम करीत आलो. आणि पक्षासाठीच लढणे. माझे घर, संसार, व्यक्तिगत आयुष्य या सर्व गोष्टींपेक्षा मी पक्षाला वरचे स्थान दिले. जेव्हा सन्मानाची वेळ आली, तेव्हा नेहमीप्रमाणे उपेक्षा आणि दुर्लक्ष यांचाच वाटा माझ्याकडे आला.
अनुभव, समर्पण, निष्ठा, संघर्ष या सगळ्यांची किंमत एका क्षणात शून्य ठरली. ज्याने नुकताच पक्षाचा झेंडा हातात घेतला, ज्याला पक्षाचा इतिहास, संस्कार, संघटन परंपरा यांची जाण नाही, अशा अनुभवहीन नवोदिताला उमेदवारी देण्यात आली. जो शहर अध्यक्षपदाच्या लायकीचे नाही त्यांना जिल्हाध्यक्ष केले गेले. तरीसुद्धा आम्ही पक्षासोबत निष्ठेने होतो. आताची परिस्थिती बघून मन खोलवर जखमी झाले. माझी निष्ठा ही कधीही पदासाठी किंवा फायद्यासाठी नव्हती. परंतु सततची उपेक्षा, त्रासदायक दुर्लक्ष आणि मेहनतीची अवहेलना या सगळ्यामुळे आज माझा आत्मसन्मान ढवळून निघाला आहे.
शहर अध्यक्ष म्हणून माझ्यावर दोनदा जबाबदारी असताना मी पक्ष संघटन वाढीवरच भर दिला. ज्यावेळी एकही नगरसेवक नव्हता. तेव्हा प्रामाणिकपणे जबाबदारी सांभाळून नगर परिषदेत नगरसेवक निवडून आणले. त्यावेळी आमदार, खासदारसुद्धा नव्हते. संघटन वाढविताना मी पक्षाचाच विचार केला. ही कामे करीत असताना अनेक गुन्हे दाखल झाले. ते कोर्टात लढाई लढलो. त्यातून निर्दोष मुक्त झालो. हिंदुत्वासाठी एकदा चार दिवस जेलमध्ये राहिलो. वर्षभर केस सुरु राहिली. इतके करूनही उपेक्षाच आली. आज आपला पक्ष व्यापाऱ्यांचा झाला आहे, असा आरोप सुद्धा मदनकर यांनी केला









