तुमसर शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष इंजि. सागर गभणे अपक्ष म्हणून रिंगणात
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर ः- तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजूभाऊ कारेमोरे यांचे कट्टर समर्थक आणि आरोग्यदूत इंजी. सागर गभणे यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठी राजकीय घोषणा केली आहे. तुमसर नगर परिषदेच्या अध्यक्ष पदाची निवडणूक ते अपक्ष उमेदवार म्हणून लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गभणे यांनी सांगितले की, पक्षाने बंडखोर व्यक्तीला तिकीट दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. जर पक्ष बंडखोराला तिकीट देत असेल, तर आम्ही निष्ठावंत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते स्वतःचे पद राजीनामे देऊ,असा इशारा त्यांनी दिला. त्यांनी पुढे म्हटले की, मागील विधानसभेत इंजी. अभिषेक कारेमोरे यांनी तुतारीचा प्रचार केला होता, हे सर्वश्रुत आहे.
अशा व्यक्तीला पुन्हा पक्षाकडून संधी देणे म्हणजे निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या त्यागाचा अपमान आहे. त्यामुळे आम्हाला अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहणे भाग आहे, असे प्रतिपादन गभणे यांनी केले. या पत्रकार परिषदेला अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष यासीन छवारे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तुमसरमधील राजकारणाला नवीन वळण देणारी ही घोषणा ठरण्याची चिन्हे आहेत. त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न सुरु आहे.









