आज सर्वच उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- आज काँग्रेसचे आ. नाना पटोले यांनी भंडारा नगरपरिषद अध्यक्षपदासाठी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सौ. जयश्री रविंद्र बोरकर यांच्या नावाची घोषणा सर्वप्रथम केली. मात्र नामांकन दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असतांना इतर पक्षाच्या उमेदवारांची घोषणा अद्यापही करण्यात आली नाही. सर्वच उमेदवार नावाच्या घोषणेच्या प्रतिक्षेत आहे. उद्या दि. १५ नोव्हेंबर रोजी सर्वच पक्षाच्या उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या नावाची चर्चा सुरु असली तरी तिकिट कुणाला मिळणार, हे दोन दिवसात कळणार आहे.

नगरपरिषद निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया दि. १० नोव्हेंबरपासूनसुरु झाली. आज पाचव्या दिवशी चारही नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासाठी एकही नामांकन दाखल करण्यात आले नाही. सदस्यपदासाठी आज दि. १४ नोव्हेंबर रोजी ५७ नामांकन दाखल करण्यात आले. भंडारा येथे ०२, तुमसर १८, साकोली ३० व पवनी येथे ०२ नामांकन दाखल करण्यात आले. नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार दिवसांपासून शांतता असलेल्या निवडणूक कार्यालयात आज पाचव्या दिवशी थोडी वर्दळ दिसली. नामांकन दाखल करण्यास आता फक्त दोन दिवस बाकी असल्याने या दोन दिवसात नामांकन दाखलकरण्यासाठी निवडणूक कार्यालयात गर्दी उसळणार आहे.

सर्वच इच्छुक उमेदवारांची कागदपत्रांची जुळवाजुळव पूर्ण झाली असून ऑनलाईन प्रक्रियेत व्यस्त आहेत. काहींचे ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरून झाले असून त्यांची तपासणीही पूर्ण झाली आहे. नगराध्यक्षपदावरील संभाव्य उमेदवारांच्या नावांची चर्चा चारही नगरपरिषदेत जोरात सुरु आहे. कोणत्या पक्षातून नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण असणार, याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. सर्वच पक्षाची यादी निश्चित झाली असून फक्त घोषणा होणे बाकी आहे. नावाच्या घोषणेची वाट न पाहता प्रचार मात्र सुरु झाला आहे.

जयश्री रविंद्र बोरकर यांच्या नावाची घोषणा

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या भंडारा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ. जयश्री रविंद्र बोरकर ह्या असतील अशी माहिती आ. नाना पटोले यांनी आज खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या कार्यालयात दिली. जयश्री बोरकर यांच्या नावाची घोषणा होताच काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी खा. डॉ. प्रशांत पडोळे व इतर काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे दै. लोकजन दि. १३ नोव्हेंबर रोजी जयश्री बोरकर यांचे नाव भंडारा नगरपरिषद नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून निश्चित झाले असून तसा एबी फॉर्म सुद्धा मुंबई येथे तयार करण्यात आल्याची बातमी प्रकाशित केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *