धानाचे कोठार खासगी व्यापाऱ्यांच्या दारात!
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील धानपट्ट्यात यंदा धानाचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी झाले असून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती डळमळीत झाली आहे. अतिवृष्टी, कीड प्रादुर्भाव आणि उत्पादन खर्चात झालेली वाढ यामुळे शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे. अशा परिस्थितीत शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र अजूनही सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना आपले धान खासगी व्यापाऱ्यांच्या दारात अल्पदराने विकावे लागत आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या कष्टाचे सोनं मातीमोल होत आहे.
तुमसर तालुका धान उत्पादक तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे किमान यातालुक्यात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्याची गरज होती. येथील शेतकऱ्यांनी व्यापारांकडे धान विक्री सध्या सुरू केली आहे. धानाची शेती परवडणारी राहिली नाही, असा सूर शेतकरी वर्गातून उमटत आहे. शासनाने नुकसानीची भरपाई देण्याचे आश्वासन दिले असले, तरी ती प्रत्यक्षात मिळेल का याबाबत शंका व्यक्त केली जातआहे.
अनेक शेतकऱ्यांनी नुकसानीसंदर्भातील कागदपत्री प्रक्रिया पूर्ण केली असली तरी अजूनही अनेक शेतकरी या प्रक्रियेपासून वंचित आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक लूट: तुमसर तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये हलक्या धानाची भरडाई सुरू झाली आहे. अशावेळी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र अद्याप सुरू न झाल्यानेशेतकरी अस्वस्थ आहेत. शासनाने तातडीने खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा शेतकऱ्यांच्या समस्या अधिक बिकट होतील.









