ई-स्कूल लर्निंग पोर्टलचे थाटात उद्घाटन

 दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी अंतर्गत संचलित समर्थ विद्यालय, राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय तसेच समर्थ महाविद्यालय, लाखनी येथील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षणाची नवी दिशा मिळावी, गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने ई-स्कूल लर्निंग पोर्टल या अत्याधुनिक उपक्रमाचे आज १३ नोव्हेंबर २०२५ रोजी समर्थ महाविद्यालयाच्या भगिनी निवेदिता सभागृहात भव्य उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आल्हाद लाखनीकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

या वेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे उपस्थित होते.प्रमुख अतिथी म्हणून आय. सी. आर. पुणे येथील शास्त्रज्ञ डॉ. किरण भगत, रवींद्र कापसे, डॉ. धनंजय गभने, तसेच श्यामराव पंचवटे हे मान्यवर व्यासपीठावर विराजमान होते. यश एडूटेक, पुणे या संस्थेमार्फत वर्ग ८ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमानुसार प्रत्येक घटकावर आधारित आकर्षक सिम्युलेशन मॉड्यूल्स तयार करण्यात आले आहेत. या मॉड्यूल्समुळे विद्यार्थ्यांना अवघड संकल्पनाही सहज समजून घेता येतील, तसेच त्यांना पडणाऱ्या प्रश्नांची अचूक व सविस्तर उत्तरेही पोर्टलवर उपलब्ध राहतील. विद्यार्थ्यांच्या स्व-अध्ययनासाठी हे पोर्टल अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे संस्थेच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले. उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आल्हाद लाखनीकर म्हणाले, ग्रामीण भागातीलविद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेत पुढे जावे, यासाठी हे पोर्टल मोठी संधी आहे. सर्व विद्यार्थ्यांनी याचा मनापासून फायदा घ्यावा. यावेळी मार्गदर्शन करताना शास्त्रज्ञ डॉ. किरण भगत यांनी सांगितले की, मेट्रो शहरांतील शैक्षणिक दर्जा ग्रामीण विद्यार्थ्यांनाही उपलब्ध व्हावा, या उदात्त हेतूने आम्ही हे पोर्टल विकसित केले आहे. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या ज्ञानभांडारात लक्षणीय वाढ करण्याचे सामर्थ्य या पोर्टलमध्ये आहे. डिजिटल माध्यमाद्वारे शिक्षण अधिक परिणामकारक होणार आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. शीतल कोमेजवार यांनी सुरेखरीत्या केले, तर प्रा. पूजा नवखरे यांनी आभारप्रदर्शन प्रस्तावित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *