समन्वय, सहकार्य व स्पर्धात्मकतेची भावना निर्माण करणे-विजय आदमने
दै. लोकजन वृत्तसेवा साकोली:- राज्यातील राज्य मंडळाच्या अधिनस्त असणाऱ्या शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या ४२ प्रकारच्या विविध स्पर्धेचे आयोजन तालुकास्तरावर करण्यात आले. क्रीडा स्पर्धा अंतर्गत साकोली तालुक्यात मैदानी स्पर्धेत १०० मीटर धावणे, थाळीफेक, गोळा फेक, भालाफेक, सांघिक खेळात हॉलीबॉल, बॅडमिंटन, खो-खो पुरुष व महिला स्पर्धेचे आयोजन तालुका क्रीडा संकुल चे मैदान व नवजीवन शैक्षणिक परिसर या ठिकाणी करण्यात आले.
स्पर्धेचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी विजय आदमने,डायटचे प्राचार्य रूद्राकार यांच्या हस्ते तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख व खेळाडू कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी आदमने यांनी सांगितले की, सर्व कर्मचारी यांच्यामध्ये शैक्षणिक प्रशासकीय कौशल्य वृद्धिंगत करणे त्यांच्यात समन्वय सहकार्य व स्पर्धात्मकतेची भावना निर्माण करणे हे त्यामागचे उद्देश आहे. तसेच त्यांच्या डिजिटल भाषिक व सादरीकरण कौशल्यांना चालना देण्याच्या उद्देशाने तालुका जिल्हा व राज्यस्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन या शैक्षणिक वर्षापासून करण्यात येत आहे. स्पर्धेचे निकष व नियमावलीमार्गदर्शक सूचना चे काळजीपूर्वक अवलोकन करण्याचे सांगितले आहे.
सदर क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी पंच म्हणून क्रीडा संघटक शाहेद कुरेशी, तुषार मेश्राम, अरविंद सोनवणे, सुशांत बांडेबुचे, अमोल वाकडे, दुधराम मानकर, मोहन रहिमतकर, भारत राठोड, श्रीधर खराबे यांनी काम पाहिले. सांघिक खेळात निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली. खो खो, वॉलीबॉल स्पर्धेसाठी तालुक्याच्या उत्तम संघ जिल्हा, विभागासाठी पाठवायचा आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या वयोमानानुसार क्रीडा कौशल्यांचे प्रदर्शन करून अत्यंत उत्साहात स्पर्धा पार पडल्या.









