सिंचन घोटाळ्यातून फडणवीसांनी तुम्हाला बाहेर काढलं, पार्थ पवार जमिनीप्रकरणात अंजंली दमानिया गौप्यस्फोट करणार
मुंबई:- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उद्या आपण पत्रकार परिषद घेऊन मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी आणखी खुलासे करणार असल्याचं म्हटलं. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेनंतर अजित पवार यांनी पालकमंत्री पद आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही अंजली दमानिया यांनी केली आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आपण सर्व कागदपत्रे दिली आहेत, त्यासंदर्भातच उद्या मोठा खुलासा करणार असल्याचे दमानिया यांनी म्हटलं. त्यामुळे, उद्याच्या पत्रकार परिषदेत त्या नेमकं कोणता खुलासा करतील, हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे. तत्पूर्वी १२ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे.
माझी महसूल मंत्र्यांसोबत बैठक झाली, मला समितीसमोर सर्वकाही डिस्पोज करायचं आहे, आणि माहिती समितीच प्रमुख विकास खारगे यांना द्यायची आहे. हे सगळे लँड माफिया कसे घोटाळे करतात हे सांगायचं आहे. पुण्याहून आलेले गायकवाड कुटुंबातील पेपर मी बावनकुळेंना दाखवले. १९३२ सालची महार वतनाची सनद, सरकारकडे जमीन दिल्यावर त्यांनी पैसे स्विकारले नाहीत, याचे देखील पुरावे दिले आहेत. पत्रांची कॉपी देखील मी त्यांना दिली आहे, गायकवाड कुटुंबांचे एक हेअरींग घेत ती जमीन त्यांना द्यायची की नाही हे सरकार ठरवेल, असेही अंजली दमानिया यांनी म्हटले. सरकारने ४२ कोटी रुपये देत व्यवहार रद्द करण्यासंदर्भाच नोटीस काढली, पण ती चुकीची आहे. महसूल विभागाकडे यासंदर्भात चौकशी नाही, हे सर्व कोर्टातून करावे लागेल, यातले काही पुरावे मी उद्या देणार, यात राजकारण आहे.
अजित पवार यांची पत्रकार परिषद मी पाहिली, गेल्या १५-१६ वर्षात काहीही सिद्ध झालं नाही असं ते म्हणाले. मात्र, सर्व सिद्ध झालं होतं, पण तुमचे मित्र देवेंद्र फडणवीस असल्याने सर्व बाजूला टाकण्यात आलं. मी सगळे घोटाळे उघड करण्यासाठी आता कोर्टात जाणारआहे, असा इशाराही अंजली दमानिया यांनी अजित पवारांना दिला. बोगस कंपन्या बनवत जमिनीचे व्यवहार झाले आहेत. सिंचन घोटाळ्यात तुम्हाला फडणवीस यांनी बाहेर काढलं आहे. मात्र, इतर घोटाळ्यात मग तुम्ही कुठेही जा, अमित शाहांकडे जा किंवा कुठेही जा, आम्ही कोर्टात जाऊ आणि प्रकरणं तडीस नेऊ, असे दमानिया यांनी म्हटलं. आपलं ते बाबल्या आणि दुसऱ्यांचं ते कारटं. सुप्रिया सुळेंकडून मला अपेक्षा नव्हती, कुटुंबातील व्यक्ती आहे, मी बोलणार नाही असं त्यांनी सांगायला पाहिजे होतं. मात्र,त्यांनीही याचं समर्थन केलं, असे म्हणत दमानिया यांनी सुप्रिया सुळेंवरही टीका केली.









