हौसे, नवसे, गवसे यांचीही नगरपरिषद आराखड्यात तयारी
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा जिल्ह्यात भंडारा, तुमसर, पवनी व साकोली-सेंदुरवाफा नगर परिषदेच्या निवडणुकीचे अर्ज दाखल करण्याची सुरुवात आजपासून सुरु झाली. विविध प्रभागातील विविध पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी आपल्यालाच मिळावी म्हणून आपली मोर्चेबांधणी सुरु केली आहे. उमेदवारीसाठी पक्षांतर पण सुरु झाले आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत अजून अनेकांचे पक्षांतर आणि बंडाळ्या दिसून येणार आहेत.
इच्छुकांना सर्वच पक्षांनी उमेदवारीसाठी अजूनही प्रतीक्षेत ठेवले असून शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारांचीनावे गुलदस्त्यातच राहतील. बंडखोरी टाळण्यासाठी ही काळजी घेतली जात असली तरी इच्छुकांच्या सहनशीलतेचा अंत संपत आल्याचेही दिसते. गत निवडणुकीनंतर नागरिकांना दर्शन दुर्लभ झालेले अनेक चेहरे या निवडणुकीतउतरतील. सामाजिक, राजकीय क्षेत्रात कोणतेही योगदान नसणारे हौसे, नवसे गावसे सुद्धा आपणच नगरसेवक होणार असल्याच्या टिमक्या वाजतव आहेत. कोणी पक्षाच्या भरोश्यावर, पैशांच्या जोरावर तर कुणी भांडवलदार वर्गाचे बाहुले बनलेले चेहरे नशीब आजमावणार आहेत.
मात्र या निवडणुकीत कोणत्याही भूलथापांना बळी न पडता आता जनतेसाठी समाजकारण व राजकारणातील प्रामाणिक चेहरे निवडण्याचा चंग यावेळी नागरिकांनी बांधल्याचे सार्वजनिक चर्चेतून दिसते. वीज, पाणी, रस्ते, नाले आणि जातपात यावर अनेक निवडणुका झाल्या. वर्षानुवर्ष जातपात व पैशाच्या बळावर अनेकजण निवडून येऊनही त्यांना मात्र या मूलभूत सुविधाहीआजपर्यंत व्यवस्थित पुरविता आल्या नाहीत. त्यातच रोजगार, वैद्यकीय, शैक्षणिक सुविधा, सार्वजनिक शौचालय यासह आता वाहतूक कोंडी, पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आहे.
अनेक वर्षात शहरात सुविधा नसल्याने स्थलांतरिक झालेली कुटुंबे,आजही ह्यामुळे शहर सोडणारी नागरिक हे सत्ताधारी ह्यांच्याइतकेच शहराचा विकास न होण्यास जबाबदार आहेत. आपल्या हक्कासाठी न भांडता स्वतः शहर सोडून गेले व परत निवडणुका आल्या की पाच वर्षांनी हेच नागरिक पुन्हा शहरात येऊन सत्ताधाऱ्यांच्या बाजुने मतदान करून निघून जातात, हेही थांबणे गरजेचे आहे. शहरात ठोस काम नाही, कोणतेही सामाजिक उपक्रम न राबवता फक्त गोड बोलून वेळकाढूपणा केला. अशा चेहऱ्यांना मतदार आता धड शिकवल्याशिवाय राहणार नाही. बदल हा निसर्गाचा नियम आहे. मात्र यंदा बघूया बदल होतो की पुन्हा त्याच दिशेने नागरिका जातात.









