टॅ्रक्टरने घेतला मजूराचा बळी
गर्रा/बघेडाः- तुमसर तालुक्यात रेतीची चोरटी वाहतूक राजरोषपणे सुरू आहे. रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर रस्त्याने कारवाई टाळण्याच्या दृष्टीने सुसाट धावत आहेत. त्या नादात अपघात घडून अनेकांचा बळी जात आहे. अशीच घटना दि. ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता दरम्यान साखळी-मिटेवानी रस्त्यावर घडली. घर बांधकामावर जात असलेल्या सायकलस्वार मजूराला रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिली. त्यात अनिल साहरू बांगरे (२६) रा. साखळी याचा जागीच मृत्यू झाला.
मृतक हा नेहमीप्रमाणे तुमसर येथे सकाळी कामावर सायकलने निघाला. साखळी-मिटेवानी रस्त्यावर एका अज्ञात रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने त्याला ध़डक देऊन घटनास्थळावरून पसार झाला. अपघातात सायकलस्वार मजूराचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती गावात होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत एकच गर्दी केली होती. माहिती मिळताच तुमसर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व प्रेत शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आले. त्याचे मृत्यूपश्चात आई-वडील, पत्नी व ३ वर्षाची एक मुलगी आहे. त्याच्या अपघाती मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास ठाणेदार गायकवाड यांचे मार्गदर्शनात तुमसर पोलीस करीत आहेत.









