सफाई कामगारांचे पुन्हा काम बंद आंदोलन

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडीः- नगरपंचायत मोहाडी येथील कचरा गाडी चालकाला कामावरून कमी केल्यामुळे सर्व सफाई कामगारांनी बेमुदत काम बंद आंदोलनाचे शस्त्र उपसले असून नगर पंचायत कार्यालयासमोर चार नोव्हेंबर पासून सर्व कामगार आंदोलनावर बसले आहेत त्यामुळे गावातील कचरा संकलनाचे काम ठप्प पडले आहे. नगरपंचायत मोहाडी येथील धनकचरा व्यवस्थापनाचे कंत्राट समाज संस्कृती विकास बहुउद्देशीय सेवा संस्था नागपूर यांना देण्यात आले आहे. कचरा गाडी चालक सुनील बानासुरे यांनी नगरपंचायत उपाध्यक्ष यांना सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ व अभाद्र व्यवहार केल्याच्या आरोप करण्यात आल्यानेकंत्राटदाराने सुनील बानासुरे यांना कामावरून काढून टाकले. त्यामुळे घनकचरा मजूर संघटनेने निवेदन देऊन आपले म्हणणे सादर केले.

सुनील बानासुरे हे मागील तीन वर्षापासून कंत्राटी मजूर म्हणून काम करीत आहेत. नगरपंचायत उपाध्यक्ष यांनी आपला राग काढण्यासाठी मजुराचा बळी घेतला असा आरोप संघटनेद्वारे केला जात आहे. यापुर्विही सफाई कामगारांना दोन महिन्यां पर्यंत मजुरी देण्यात आली नसल्याने मजुरांनी दोन वेळा काम बंद आंदोलन केले होते हे विषेश. सध्या अवकाळी पाऊस सुरु आहे अशात अनेक कच्च्या व पक्क्या नाल्या तुंबुन पाण्याची निकाशी थांबते व नागरीकांना त्रास सहन करावा लागतो. काम बंद आंदोलनाने आता नागरीकांना पुन्हा याचा त्रास सहन करावा लागणार आहे. शहरातील कचरा संकलनथांबल्याने आता जिकडे तिकडे कचराच कचरा दिसून येणार असून रोग राईला आमंत्रण मिळणार आहे. स्वच्छ शहर सुंदर शहर असे म्हणण्या ऐवजी घाण व कचरा शहर असे म्हणण्याची वेळ येऊ नये हीच देवाकडे प्रार्थना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *