आचार संहितेचे पालन करा -निवडणूक निर्णय अधिकारी

दै. लोकजन वृत्तसेवा साकोलीः- राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला असून, साकोली सेंदुरवाफा नगरपरिषद निवडणुकीच्या संयोगाने निवडणूक निर्णय अधिकारी निलेश कदम यांनी साकोली येथे पत्रकार परिषद आयोजित करून नगरपरिषद निवडणुकीकरिता राजकीय पक्ष व जनतेने आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन पत्रकार परिषदेत केले आहे. साकोली-सेंदूरवाफा नगरपरिषद निवडणूक २ डिसेंबर २०२५ रोजी पार पडणार आहे. तर मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे संबंधित क्षेत्रात ४ नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी निलेश कदम व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश वासेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. साकोली-सेंदूरवाफा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण १० प्रभागांमधून २० सदस्य निवडले जाणार आहेत. नगराध्यक्ष पदाची निवड थेट जनतेमधून केली जाणार आहे. एक जुलै २०२५ रोजी मंजूर मतदार यादीनुसार एकूण २२,६८१ मतदार (पुरुष ११,०४० व स्त्री ११,६४१) मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास १० नोव्हेंबरपासून सुरुवात होईल, तर त्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर आहे.

छाननी १८ नोव्हेंबर, माघारीची अंतिम मुदत अपील नसलेल्या ठिकाणी २१ नोव्हेंबर आणि अपील असलेल्या ठिकाणी २५ नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे. आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबतही आयोगाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. निवडणुकीच्या निकालापर्यंत आचारसंहिता प्रभावी राहील. मतदान सुरू होण्याच्या २४ तास आधी म्हणजेच ३० नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजेपासून प्रचारबंदी लागू होईल. या कालावधीनंतर सभा, मोर्चे तसेच ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. निवडणुकीशी संबंधित जाहिराती, प्रसारण व प्रचारात्मक उपक्रम पूर्णपणे बंद राहतील. आगामी निवडणुकीसाठी प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज केल्या असून शांत, पारदर्शक व सुरळीत निवडणुकीसाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी निलेश कदम यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *