नाशिकमध्ये भाजपकडून अजितदादांच्या राष्ट्रवादीला शह देण्याची रणनीती; कोकाटे, झिरवाळांविरोधात विधानसभा लढलेल्या नेत्यांनाच पक्षात घेतलं, नेमकं चाललंय तरी काय?

नाशिकः- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने ग्रामीण भागात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असणाऱ्या मतदारसंघात प्रवेश करून मित्र पक्षालाच शह देण्याची रणनीती आखली जात आहे. यातूनच आज मंत्री माणिकराव कोकाटे आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात निवडणूक लढविणाऱ्यांचे पक्ष प्रवेश करण्यात आले.

राज्यात एकीकडे बोगस मतदारांच्या मुद्यावरून महाविकास आघडीकडून भाजपला टार्गेट केले जातं असतानाच भाजपकडून पक्षाचा विस्तार आणि विरोधी पक्षाला खिळिखळे केले जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत ३ नोवहेंबर रोजी नाशिकच्या दिंडोरी आणि सिन्नर विधानसभा मतदारसंघात दोन महत्वाचे प्रवेश झाले. दिंडोरीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात निवडणूक लढविणाऱ्या सुनीता चारोस्कर आणि त्यांचे पती माजी आमदार रामदासचारोस्कर यांचा पक्ष प्रवेश झाला. तर सिन्नरमध्ये शरद पवारांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसमधून राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना आव्हान देणारा युवा चेहरा उदय सांगळे यांना रेड कार्पेट टाकण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *