सन २०११ पूर्वीच्या अतिक्रमकांना हक्काचे पट्टे त्वरित द्या
दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- सरकारी जमिनीवर सन २०११ पूर्वी निवासी अतिक्रमण करून वास्तव्यास असलेल्या पात्र नागरिकांना तात्काळ हक्काचे पट्टे (कायदेशीर मालकी हक्क) वाटप करण्यात यावेत, अशी आग्रही आणि ठोस मागणी मोहाडी तालुक्यातील हरदोली येथील रहिवासी माजी सरपंच सदाशिव शिवाजी ढेंगे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याकडे एका लेखी अर्जाद्वारे तहसीलदारामार्फत केली आहे. शासनाच्या निर्णयाला १२ वर्षे उलटूनही प्रशासनाच्या दिरंगाईमुळे नागरिकांना हक्क मिळत नसल्याचा संतप्त सूर यावेळी उमटला.
शासनाने परिपत्रक जारी करून अतिक्रमणांचे नियमन करून पात्र लाभार्थ्यांना पट्टे देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. मात्र, या निर्णयाच्या अंमलबजावणीत जिल्हा प्रशासन दिरंगाई करत असल्याचा आरोप अर्जदार सदाशिव ढेंगे यांनी केला आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कार्यप्रणालीमुळे अद्यापही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. ग्रामपंचायतींकडून कायमस्वरूपी निवासी अतिक्रमणांचे प्रस्ताव खंड विकास अधिकारी, तहसीलदार, तसेच उपविभागीय अधिकारी (एसडीओ) यांच्याकडे सादर झाले आहेत. तरीही, “एकाही पात्र लाभार्थ्याला अद्याप पट्टा मिळालेला नाही,’ असा थेट आरोप सदाशिव ढेंगे यांनीनिवेदनात नमूद केला आहे. पालकमंत्री डॉ. पंकज भोयरया मागणीवर काय निर्देश देतात, याकडे आता मोहाडी तालुक्यातील शेकडो अतिक्रमणधारकांचे लक्ष लागून राहिले आहे.









