शिक्षक व अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी तालुकास्तरीय विविध स्पर्धां; भंडारा तालुक्यात नियोजन पूर्ण, गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड

*आनंददायी वातावरणात सर्व स्पर्धा यशस्वी करा
*गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड यांचे सभेत आवहान
भंडारा:- राज्यातील राज्य मंडळाच्या अधिनिस्त असणाऱ्या सर्व शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थाअनुदानित,अंशतः अनुदानित, प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, डायट मधील अधिकारी कर्मचारी, तसेच शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षीय यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी यांच्यामध्ये शैक्षणिक, प्रशासकीय, कौशल्य वृद्धिंगत करणे, त्यांच्यात समन्वय सहकार्य व स्पर्धात्मकतेची भावना निर्माण करणे, तसेच त्यांच्या डिजिटल भाषिक व सादरीकरण कौशल्यांना चालण्या देण्याच्या उद्देशाने तालुका जिल्हा व राज्यस्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन शैक्षणिक वर्ष 2025- 26 पासून करण्यात येत आहे. याकरिता स्पर्धांच्या आयोजनासाठी निकष आणि नियमावली तयार करण्यात आली असून सदर स्पर्धा ह्या एकूण 42 विषयावर आधारित आहेत. याविषयी संपूर्ण माहिती तालुकास्तरावर सर्व कर्मचाऱ्यांना देऊन लिंक भरण्यासंबंधी सूचना करण्यात आल्या व स्पर्धा सुरळीत व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडावे या दृष्टीने पंचायत समिती भंडारा अंतर्गत संबंधित शाळांना सूचना देऊन व्यवस्थितरित्या नियोजन करण्यात आले आहे., अशी माहिती भंडारा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड यांनी दिली.
गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड पुढे म्हणाले. नोव्हेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या स्पर्धा आठवड्याच्या शेवटच्या शुक्रवार व शनिवार या दिवशी आयोजित होणार असून सलग चार आठवडे सदर स्पर्धा होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने 42 स्पर्धा असून त्यांची विभागणी करण्यात आली आहे. यासाठी क्रमांक एक ते तीन स्पर्धांसाठी डिफेन्स स्कूल शहापूर, क्रमांक चार ते आठ साठी गांधी विद्यालय पहेला, क्रमांक नऊ ते वीस साठी नूतन कन्या विद्यालय भंडारा, क्रमांक 21 ते 29 साठी नूतन महाराष्ट्र विद्यालय भंडारा व क्रमांक 30 ते 42 जकातदर कन्या विद्यालय भंडारा येथे होणार आहे. अशा प्रकारे नियोजन शाळांना देण्यात आलेले आहे. यासाठी चार टप्प्यांमध्ये स्पर्धेचे आयोजन होणार आहे. यासाठी समन्वयक नेमण्यात आले आहेत. त्यांच्याकडे सर्वस्वी जबाबदारी देण्यात आली आहे. यासाठी पंचायत समिती भंडारा अंतर्गत साधन व्यक्ती व विशेष शिक्षक यांच्याकडे समन्वयकाची जबाबदारी देण्यात आली आहे. तालुका नोडल अधिकारी सुधाकर कंकलवार केंद्रप्रमुख पहेला व तालुका सहाय्यक नोडल अधिकारी महेश जगनिक मुख्याध्यापक पिंपळगाव यांची नेमणूक करण्यात आली आहे. पर्यवेक्षीय यंत्रणा तालुकास्तरावरून गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड, विस्तार अधिकारी सौ. शिल्पा निखाडे,गिरधारी भोयर यांच्या मार्गदर्शनामध्ये स्पर्धा होणार आहेत. सदर स्पर्धेच्या आयोजना संबंधी विशेष सहकार्य करणारे नरेंद्र पालांदुरकर संचालक डिफेन्स अकॅडमी शहापूर, सौ. निलू तिडके मुख्याध्यापिका नूतन कन्या विद्यालय भंडारा, श्री काटेखाये मुख्याध्यापक गांधी विद्यालय पहेला, कुमारी रीना काळे मुख्याध्यापिका जे. के. हायस्कूल भंडारा, श्री तरोने मुख्याध्यापक, नूतन महाराष्ट्र विद्यालय भंडारा यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.
सदर स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या स्पर्धकांना विभाग आणि राज्यस्तरावर जाण्याची संधी मिळणार आहे.यामध्ये कर्मचाऱ्यांना आपले कलागुण दाखवण्याची संधी शासनाने दिलेली आहे.करिता सर्व केंद्रप्रमुख व विषय साधन व्यक्ती यांनी भंडारा शहरातील शिक्षकांना संपर्क साधून ऑनलाईन लिंक भरावी, शिक्षकांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेऊन सहकार्य करावे. त्याचप्रमाणे सर्वांनी आवड असलेल्या स्पर्धांसाठी असलेली लिंक भरून आपली नोंदणी करावे असे आवाहन गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड, विस्तार अधिकारी सौ.शिल्पा निखाडे, गिरधारी भोयर यांनी केले आहे.







