पोलिसांच्या धाडसत्रानंतरही; रेत माफिया थांबेना

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- पोलीस व महसूल विभागाच्या धाड सत्रानंतरही रेत माफीयांची मुजोरी वाढली आहे. रेती चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. महसूल विभाग व पोलीस प्रशासनाला कार्यवाहीचा कुठेतरी विसर पडत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. स्थानिक गुन्हे शाखा भंडाराच्या कार्यवाही नंतरही रेती चोरीचे सत्र सुरूच आहे. तुमसर येथे आयपीएस अधिकारी मयंक माधव हे पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून दोन महिन्यापूर्वी रुजू झाले आहेत.

तुमसर शहरातील चोऱ्या, वाढती गुन्हेगारी व रेती चोरी प्रकरण एक आव्हानाच ठरले आहे. रेती चोरी सारख्या गुन्हेगारीप्रवृत्तीवर आळा बसविण्यासाठी सिहोरा, नाकाडोंगरी व लेंडेझरी हे ३ वनपरिक्षेत्र कार्यालय तर सिहोरा गोबरवाई व तुमसर असे ३ खंदे समर्थक पोलीस स्टेशन आहेत. १ उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय व मध्यभागी तुमसरचे तहसील कार्यालय आहे. तरीही रेती चोरी थांबविता थांबेना यामुळे महसूल विभाग व पोलीस प्रशासनाला कायद्याचा विसर पडला की काय ही चर्चा चांगलीच जोर धरून आहे. सद रक्षणाय व खलनिग्रहणाय हे पोलीस विभागाचे ब्रीद वाक्य असलेली पाटी पोलीस स्टेशनच्या दर्शनी भागात नेहमीच पाहावयास मिळते. या वाक्याचा अर्थ सामान्य जनतेला सुरक्षित ठेवून खल वृत्तीने वागणाऱ्याला कायद्याच्या चाकोरीत राहून प्रतिबंध करण्याचे काम पोलिसाकडून अपेक्षित आहे. परंतु या खलनिग्रहणायचा पोलीस खात्याला विसर पडल्याचा दिसतो आहे.

अवैध रेती प्रकरणात काही दिवसापूर्वी स्वप्निल पाटील सिंदपुरी यांचे विरुद्ध सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.२४ जून रोजी स्थानिक शाखा भंडाऱ्याचे प्रवीणबाबाराव पाटील व सिहोराचे पोलीस निरीक्षक विजय कसोधन यांनी संयुक्त कारवाई करीत २८ लाख रुपयांचा मुद्देमाल व ७ आरोपींवर सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल केला होता. सदरची कारवाई टेमनी जंगल शिवारात सोंड्या ते चांदपूर रस्त्यावर करण्यात आली होती. तसेच रेती चोरी प्रकरणात ३ ऑगस्ट रोजी माडगी घाटावर स्थानिक गुन्हे शाखेने कार्यवाही करीत ४ ट्रॅक्टर सह अवैध रेती जप्त करून चालक-मालक यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जवळच असलेल्या डोंगरला येथील चंद्रमोहन यादवराव बनकर वय ३२ वर्षे याला ८ ऑगस्ट रोजी निळ्या रंगाचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर वर गुन्हा दाखल करून ६ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. घरकुलाच्या नावावर मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी होत आहे. या रेती चोरी प्रकरणाची शुंखला केव्हा थांबेल हा सिहोरा परिसरात चर्चेचा विषय आहे. रेती चोरी प्रकरणात तुमसरचे एसडीओ व तहसीलदार निलंबित झाले आहेत. यांचेवर भ्रष्टाचारात सहभाग असल्याचा विभागीय आयुक्तांच्या चौकशीत ठपका ठेवण्यात आला होता. प्रशासनाला रेती चोरी प्रकरणाची शृंखला जर थांबविता येत नसेल तर तुमसर चे एसडीओ व तहसीलदार यांचेवर झालेली कारवाई ही बेकायदेशीर नाही का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *