प्रशासकीय मान्यता न घेताच निविदा प्रक्रिया सुरु, पवनी व भंडारा न. प. च्या मुख्याधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांची कारणे दाखवा नोटीस

  • भंडारा: जिल्हा वार्षिक योजनेच्या अर्थसंकल्पीत तरतुदीच्या कामांना जिल्हाधिकाऱ्यांची प्रशासकीय व तांत्रिक मान्यता न घेता कामांची निविदा प्रक्रिया सुरू करून नंतर ती रद्द केल्या प्रकरणी पवनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश इंगोले व भंडारा नगर परिषदेचे करणकुमार चव्हाण यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तीन दिवसात स्पष्टीकरण द्या, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, असाही स्पष्ट करण्यात आले आहे.
    जिल्हा वार्षिक योजना 2025-2026 अंतर्गत मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीच्या अधीन राहून कामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात शासनाच्या मार्गदर्शक सूचना आहेत. जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकराची मंजुरी घ्यावी लागते. मात्र पवनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी निलेश इंगोले व भंडारा चे करणकुमार चव्हाण यांनी प्रशासकीय किंवा तांत्रिक मंजुरी न घेता “प्रशासकीय मंजुरीच्या अधीन राहून” असे नमूद करीत निविदा प्रक्रिया सुरू केली व नंतर ती रद्दही केली. हा प्रकार अधिकारांचा दुरुपयोग, प्रशासकीय अनियमितता असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. या संदर्भात काही आमदार आणि लोकप्रतिनिधींनी आक्षेप घेतला असून आपल्याकडून शासन निर्देशाचे उल्लंघन, वित्तीय शिस्तभंग आणि प्रशासकीय गैरजबाबदारी सिद्ध करणारा असल्याने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रशासकीय मान्यता न घेता निविदा प्रक्रिया सुरु करण्याचे व नंतर ती रद्द करण्याचे कारण काय? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. तीन दिवसाच्या आत योग्य पुराव्यांसह आपले मत मांडावे. समाधान न झाल्यास प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

 

  • नेमका दबाव कुणाचा?
    एखाद्या अधिकाऱ्याकडून शासकीय नियमांचे उल्लंघन करून निविदा प्रक्रिया सुरु करण्याचा आणि नंतर ती रद्द करण्याचा प्रकार होतं असेल तर यामागे नेमका दबाव कुणाचा हा प्रश्न उपस्थित होतो. एखादा अधिकारी स्वतःच्या मताने खरच एवढी हिंमत करू करू शकतो का? अशीही चर्चा सुरु आहे. दरम्यान मुख्याधिकाऱ्यांच्या स्पष्टीकरणात यातील बऱ्याच गोष्टीचा उलगडा होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *