गोरेगाव साप्ताहिक बाजारातील त्रस्त ! वसुलीवर भर…स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष! अस्वच्छतेने नागरिक

गोरेगाव:- गोरेगाव शहरातील साप्ताहिक बाजारपेठ आता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शनिवारी भरवल्या जाणाऱ्या या बाजारात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले असून, सडलेल्या भाज्यांचा कुजका वास चारही बाजूंना पसरत आहे. त्यामुळे बाजार परिसरात राहणाऱ्या नागरिकांना आपल्या घरातसुद्धा नाक दाबून बसावे लागत आहे. स्थानिक नगरपंचायतीकडून बाजारातील वसुलीसाठी तर ठेकेदाराला पावती दिली जाते, पण स्वच्छतेकडे मात्र कोणीही लक्ष देत नाही. “वसुलीवर जोर, पण सफाई मात्र नादुरुस्त !’ अशी परिस्थिती असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.

शनिवारी बाजार भरतो आणि रविवारीसुद्धा कुजलेल्या भाज्यांचे अवशेष तिथेच पडून राहतात. आठवड्यानंतर आठवडा हीच दुर्दशा सुरू आहे. ठेकेदाराकडून दर आठवड्याला हजारो रुपयांची वसुली केली जाते, परंतु स्वच्छता मात्र “देवभरोसे’ ठेवण्यात आली आहे. बाजारात पडलेल्या सडलेल्या भाज्यांमुळे केवळ दुर्गंधीच नव्हे, तर माशा, डास आणि रोगांचा फैलाव होण्याचा धोका वाढला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गदा येतेय, याकडे कोणाचे लक्ष? असा सवालआता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *