गटग्रामपंचायतींच्या इच्छुकांना लागले निवडणुकीचे वेध
दै. लोकजन वृत्तसेवा पालांदूर:- लाखनी तालुक्यातील एकून ७१ ग्रामपंचायतीपैकी २० ग्रामपंचायतीची मुदत येत्या डिसेंबर अखेर संपत असल्यामुळें या मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकरिता इच्छुक आतापासूनच तयारीसाठी लागले आहेत. आता निवडणुका केव्हा जाहीर होणार याकडे लाखनी तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
सरपंचपदाची थेट निवडणूक
राज्य पातळीवर मुख्यमंत्रीपद हे जसे सर्वोच्च असते. तसेच, गाव खेड्यांमध्ये सरपंचपद सर्वोच्च असते. छोट्या खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायतींमार्फत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवकांच्या मदतीने चालतो. आता थेट जनतेतून सरपंच निवडणे म्हणजे मतदार थेट सरपंचपदासाठी उभ्या असलेल्या उमेदवारांना मतदान करणार आहेत. २०१७ पूर्वी म्हणजे भाजप-शिवसेना युतीने सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतला होता. त्यापूर्वी सरपंच ग्रामपंचायतीच्या विजयी सदस्यांच्या बहुमताने निवडला जायचा. गावाच्या विकासाचे बहुतांश अधिकार सरपंचाच्या हातात असतात. त्यामुळे सरपंचपदाला महत्त्व आले आहे.
लोकसभेचे पडसाद पडण्याची शक्यता
मागिल वर्षी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अनेक संभाव्य इच्छुकांनी आपापल्या वॉर्डातून मताधिक्य देऊन ताकत दाखवून दिली होती. गावपातळीवरच्या निवडणुकीत तालुकास्तरावरील नेत्यांची नाराजी नको म्हणून काही इच्छुकांनी पडद्याआडून भूमिका बजावली. तर, काहींनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीतच आपल्या वॉर्डावर लक्ष केंद्रित करून आपला प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला होता.
जुळवाजुळव सूरू
इच्छुकांनी आत्तापासून चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे एकमेकांच्या भेटी घेणे, सोशल मीडियावर बॅनर बनवून त्याचे व्हॉट्सॲप, फेसबुक द्वारे आपण उमेदवार असल्याचे जाणीव करून देणे त्यासाठी लोकांच्या गाठीभेटी घेत व लग्न कार्य, वाढदिवसाला उपस्थित राहून आत्तापासून मतांची जुवळवाजुळव करु लागले आहेत. या विषयीच्या गप्पा आता रात्री बारा-बारा वाजेपर्यंत रस्त्यावर, चावडी कट्टा त्याठिकाणी रंगू लागल्या आहेत. एकूणच लाखनी तालुक्यातील २० गटग्रामपंचायतींची निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे, अशी चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत.
इच्छुक उमेदवारांची मोर्चेबांधणी
इच्छुकांनी निवडणूक लढविण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास आतापासूनच सुरुवात केली आहे. ग्रामपंचायतींत सरपंचपदासाठी इच्छुकांमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता दिसून येत आहे.सरपंचपदाची निवडणूक थेट मतदारांमधून होणार असल्याने, ग्रामपंचायत निवडणुकांनाही गेल्या काही वर्षांत आमदारकीच्या निवडणुकीसारखे ग्लॅमर येत आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर होणार, याची संपूर्ण लाखनी तालुकावासियांना प्रतीक्षा आहे.







