दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू
दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- रात्री जेवन झाल्यानंतर नेहमीप्रमाणे एका मित्रासोबत फिरायला गेला आणि नियतीने डाव साधला. मागून येणाऱ्या भरधाव दुचाकी ने त्याला जोरदार धडक दिली व तो डांबर रस्त्यावर पडला डोक्याला इजा झाल्यामुळे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुनील भैयालाल पशिने (५२) रा. कुशारी असे मृतकाचे नाव आहे.
२६ ऑक्टोंबर रविवारला मोहाडी जवळील कुशारी येथे मंडई चे कार्यक्रम असल्याने प्रत्येकाच्या घरी पाहुणे आलेले होते. मृतक सुनील पशीने आणि विठ्ठल मलेवार हे दोघेजण जेवण करून रात्री १० वाजता मोहाडी- रोहा या रस्त्यावर नेहमीप्रमाणे फिरायला गेले होते.
गावात मंडई असल्यामुळे वाहनांची ये जा सुरू होती. इतक्यात अचानकपणे भरधाव वेगाने आलेल्या एका दुचाकीने सुनिल पशिने यांना मागुन जोरदार धडक दिली. सुनिल पशिने हे डांबर रस्त्यावर डोक्याच्या भाराने आदळले व ते गंभीर जखमी झाले. दुचाकी चालक विक्की उर्फ विकास कारेमोरे व मागे बसलेले दोन युवक सुद्धा रस्त्यावर पडून जखमी झाले. सुनील पशिने यांना ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथे प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. पुढील तपास मोहाडी पोलीस करीत आहेत.







