तुमसर येथील प्रभाग क्रमांक ६ मधील विकासकामे तातडीने पूर्ण करा
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर:- स्थानिक प्रभाग क्रमांक ६ मधील नागरिकांनी आपल्या परिसरातील विविध अपूर्ण विकासकामांकडे नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधून तातडीने कामे पूर्ण करण्याची मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, गांधी सागर तलाव परिसर तसेच कटंगी रोड भागात नाली सफाई, रस्ते व पुलीया बांधकाम, तसेच तलाव स्वच्छतेची कामे दीर्घकाळापासून रखडली आहेत. पाणी पुरवठा योजनेअंतर्गत करण्यात आलेले खोदकाम अद्याप अपूर्ण असून, त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
नागरिकांनी तलाव परिसरात फवारणी करण्यासोबतच नाली व रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करण्याची मागणी केली आहे. तसेच, अपूर्ण राहिलेल्या पाणीपुरवठा कामांना गती देऊन परिसरातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी अश्विनी सुनील थोटे यांच्या नेतृत्वाखाली प्रभागातील महिलांनी केली आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, प्रतीक निखाडे, सुनील थोटे सह असंख्य प्रभागातील महिला उपस्थित होत्या. प्रभागातील ही कामे लवकरात लवकर मार्गी लागावीत, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही निवेदनातून नागरिकांनी यावेळी दिला आहे. गांधी सागर तलाव परिसर स्वच्छ व फवारणी चे कार्य तातडीने करण्यात येईल अशी माहिती न. प. मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी दिली.







