अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या धान पिकाचे तात्काळ पंचनामे करून मदत द्या

दै. लोकजन वृत्तसेवा लाखनीः- तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले शेतकऱ्यांचे धान पिकाचे पंचनामे करून तात्काळ मदत देण्यात यावी, पिक विमा योजनेची रक्कम नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने देण्यात यावी, आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, संजय गांधी निराधार योजनेची निधी तातडीने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावी या मागण्यांचा लाखनी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष योगराज झलके यांच्या नेतृत्वाखाली आज तहसीलदार साहेब यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आला.

भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात अतिवृष्टीने धान पिकाचे फार मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी फार हवालदिल झाला आहे. त्वरित मोका पंचनामे करून मदत देण्यात यावी व राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५०,०००/- रुपये मदत देण्यातयावी. तालुक्यामध्ये सिंचन सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने धान पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येत असते, काही शेतकऱ्यांनी धान पिकाची कापणी, मळणी केली, तर काही शेतकऱ्यांचे धान पीक कापून कळपा शेतातच आहेत, बहुतांश शेतकऱ्यांचे धानाचे पीक अजूनही शेतातच उभे आहेत.

अशातच मागील तीन दिवसापासून संपूर्ण तालुक्यामध्ये ठिक ठिकाणी अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्याने शेतात पाणी साचले, कापलेला धान्याचा कळपा पाण्यावर तरंगू लागल्या, तर उभे असलेले धान पीक वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसामुळे शेतातच पडल्याने पाण्याखाली आले. यात शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हवालदील झाला, संकटात सापडला आहे. तर या शेतकऱ्यांना शासनाने झालेला नुकसानाची तात्काळ सर्वे करून नुकसान भरपाई देण्यात यावी. ई – पिक, पिक पाहणी सर्वेक्षणात तांत्रिक अडचणीमुळे ७/१२ वर नोंदी होवू न शकल्यामुळे शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम मिळाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना अडचण निर्माण होत आहेत. तातडीने ७/ १२ वर नोंदी घेऊन शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याची रक्कम जमा करावी.

खरीप हंगामातील धान खरेदी सुरू करण्यासंबंधाने अजूनपर्यंत कोणतीही प्रक्रिया सुरु झालेली नाही. निवेदनानुसार २०२५-२६ या वर्षातील खरीप हंगामातील धान पीक निघून एक महिन्याचा कालावधी झाला. मात्र, तालुक्यात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना कमी भावाने धानाची विक्री करावी लागत आहे. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. शेतकऱ्यांची ही आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी त्वरित शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करावे. संततधार पावसामुळे यापूर्वी शेतकऱ्यांकडील धानाची प्रत खालावली आहे. त्याचाही उत्पन्नावर परिणाम होणार आहे. व्यापारीदेखील याच कारणामुळे कमी दराने धान खरेदी करीत आहेत.

हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाल्यास काही अशी स्पर्धा वाढून दरात तेजी येण्याची शक्यता आहे. पण आता आपण शेतकऱ्यांसोबत धोकाधडी करत आहात. हे काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उचलण्याचा काम करीत आहोत. संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, विधवा महिला पेन्शन योजना, वृद्धपकाळ पेन्शन योजना या योजनांचे अनेक वर्षापासून महिने थकीत आहेत.त्यामुळे लाभार्थ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. ही बाब गंभीर असून या योजनांचे थकीत असलेले महिने तातडीने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावे. तरी वरील सर्व मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा काँग्रेस पक्षातर्फे जन आंदोलन करण्यात येईल.

यावेळी यांच्यासह जिल्हा महासचिव राजुभाऊ निर्वाण, खरेदी विक्री समितीचे सभापती महादेव गायधनी, खरेदी विक्री संचालक जयकृष्ण फेंडरकर, खरेदी विक्री समितीचे संचालक नामदेव राऊत, लाखनी शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष मोहन निर्वाण, नगरसेवक नगरपंचायत लाखनी प्रदिप तितीरमारे, विजय वाघाये, टेकराम बोरकर, अनिल बावनकुळे, धनपाल बोपचे, संजय बडवाईक, दुर्गेश चोले, हेमंत बडवाईक, रामानंद निपाने, रुपचंद सोनवाणे, विनोद राघडे, माधवराव भोयर, अतुल पाटील भांडारकर आणि काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *