कारधा टी-पॉइंटवर दुचाकी, कार अपघात; दोघे गंभीर
भंडारा : नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील कारधा टी-पॉइंट येथे शनिवारी सकाळी झालेल्या एका अपघातात दोन इसम गंभीर जखमी झाले. शनिवार, २५ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ८:१० मिनिटांच्या सुमारास हा अपघात झाला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पवनी येथील धनपाल रमेश मेश्राम (३५) आणि कारधा येथील मोरेश्वर मनोहर मिंडवाडे (२९) हे दोघे एमएच ३६ एके ०१५३ क्रमांकाच्या दुचाकीने पवनीकडून कारधा दिशेने जात होते.
दरम्यान, नागपूरकडून रायपूरच्या दिशेने जाणाऱ्या एमएच ४६ एयू ९६७८ या चारचाकी वाहनाने टी-पॉइंटवर जोरदार धडक दिली. या अपघातात धनपाल आणि मोरेश्वर या दोघांच्या हात व पायाला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य श्रीक्षेत्र नाणिजधाम यांच्या प्रेरणेतून सुरू असलेली रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल झाली व जखमींना तातडीने भंडारा जिल्हा रुग्णालयात दाखल करून त्यांचे प्राण वाचविण्यात आले.







