राजीव गांधी चौक अवैध पार्किंगच्या विळख्यात

भंडारा : शहराच्या मध्यवर्ती भागातील राजीव गांधी चौक अवैध पार्किंगमुळे वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या त्रासाचे केंद्र बनले आहे. दोन्ही बाजूंनी बेशिस्तपणे उभी केलेली वाहने, फूटपाथ अडवून थेट आडवी केलेली पार्किंग आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे नागरिक, पादचारी तसेच रुग्णालयांत ये-जा करणारे रुग्ण सर्वच त्रस्त झाले आहेत. फूटपाथ व्यापल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालण्याशिवाय पर्याय राहत नाही. या चौकातील मुख्य रस्त्यावरील वाहनांची गर्दी इतकी वाढली आहे की, सतत वाहतूक कोंडीचे चित्र दिसते. परिणामी नागरिकांना थांबावे लागते, तसेच रुग्णालयांकडे जाणाऱ्यारुग्णवाहिकांनाही मार्ग काढण्यास कठीण जाते. या परिसरात खासगी रुग्णालये मोठ्या प्रमाणावर आहेत.

रुग्णांना घेऊन येणारी वाहने किंवा नातेवाइकांच्या गाड्यांची रांग कायम असते. परंतु नियोजित पार्किंगची सोय नसल्याने चालक मनमानीपणे रस्त्यालगत गाड्या उभ्या करतात. काही ठिकाणी औषधांच्या दुकानांसमोरील फूटपाथदेखील पूर्णपणे अडविलेला दिसतो. नगर परिषदेकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या, पण केवळ आश्वासनांवरच गोष्ट थांबते. प्रशासनाने तत्काळ टोईंग व्हॅन चालू करून दंडात्मककारवाई सुरू करावी. तसेच पेड पार्किंगची व्यवस्था रुग्णालय प्रशासनाच्या सहकार्याने केली तर समस्या सोडवता येतील, अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *