दिवाळीनंतरही धान खरेदी केंद्रे सुरु न झाल्याने शेतकरी अडचणीत
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसरः- खरीप हंगामातील हलक्या धानाची कापणी आणि मळणीची कामे सध्या जोमात सुरू आहे. दिवाळीत या धानाची विक्री करून शेतकरी दिवाळी सण साजरा करतात व उधारउसनवारी फेडतात. मात्र, यंदा ऑक्टोबर महिना संपत आला तरी अद्यापही शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्याची कुठलीच प्रक्रिया सुरू झाली नाही, तर शासनाने सुद्धा धान खरेदीपूर्वी नोंदणी करण्याचे आदेश काढले नाही. त्यामुळे हलका धान बाजारपेठेत, पण शासकीय धान खरेदी केंद्राचा ठावठिकाणा नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात खरीप आणि रब्बीया दोन्ही हंगामात धानाचे उत्पादन घेतले जाते. तसेच शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दराने धानाची विक्री करावी लागू नये यासाठी शासन जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्यामाध्यमातून शासकीय धान खरेदी केंद्रावरून धान खरेदी करते.
यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्यास मदत होते. जिल्ह्यातयंदा खरीप हंगामात १ लाख ८३ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली आहे. यात हलक्या धानाचे क्षेत्र अधिक आहे. हलके धान हे दिवाळीपूर्वी निघत असल्याने शेतकरी या धानाची लवकरात लवकर विक्री करून दिवाळी सण साजरा करतात. मात्र, यंदा हलका धान बाजारपेठेत आला तरी शासकीय धान खरेदीला सुरुवात झाली नाही. परिणामी शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी भावाने खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करावी लागत आहे, तर शेतकऱ्यांच्या नजरा शासकीय धान खरेदी केंद्र केव्हा सुरू होते याकडे लागल्या आहेत.







