४० ब्रास रेतीचा साठा जप्त : गुन्हा दाखल होणार का?
दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- चुल्हाड येथील सहकारी राईस मिलच्या जागेत अंदाजे ४० ब्रास अवैध रेतीसाठा महसूल विभागाच्या कारवाईतून जप्त केल्याने सहकारी राईस मिल चुल्हाड येथील संचालकावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात रेती साठा आढळून आल्याने महसूल विभागाने गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली होती हे येथे उल्लेखणीय आहे. तुमसर तालुक्यात अजूनपर्यंत कोणत्याही रेती घाटाचे लिलाव झाले नसताना तसेच रेतीघाट आणि डेपो बंद असताना येथे ९ कोटी रुपयाच्या सिमेंट रस्त्याचे बांधकाम धडाक्यात सुरू आहे. रस्ता बांधकामासाठी (विना रॉयल्टी) चोरीच्या रेतीची वाहतूक उघडकीस आल्यानंतर महसूल विभागाने सहकारी राईस मिल चुल्हाडच्या परिसरातून अंदाजे ४० ब्रास रेतीचा साठा जप्त करण्याची कारवाई केली आहे.
रेती घाट आणि डेपो बंद असताना चुल्हाड ते मुरली या ९ किलोमीटर अंतराचा सिमेंट रस्त्याचे बांधकाम कंत्राटदाराने सुरू केले आहे. रस्ता बांधकामाची सुरुवात चुल्हाड गावातून थेट पहिल्या टप्प्याच्या चोरीच्या रेतीतून केले आहे. या प्रकरणात ट्रॅक्टर मालक, चालक व कंत्राटदारच्या विरोधात अजून पर्यंत कारवाई करण्यात आली नाही. यामुळेच राईस मिल परिसर आणि रस्त्याच्या कडेला चोरीच्या रेतीचे ढीग उभे करण्यात आले आहेत. चोरीची रेती लपविण्यासाठीकाळ्या चुरीचा थिगर लावण्यात आला आहे. थेट तलाठी कार्यालयाच्या आवारात चोरीच्या रेतीचे ढिगारे असतानाही महसूल विभागाने दखल घेतलेली नाही. कार्यालयात तलाठी उपस्थित असतानाही सिमेंट रस्त्याच्या कामात चोरीची रेती उपयोगात आणल्या गेली तरीसुद्धा कारवाईसाठी पुढाकार घेतलेला नाही. म्हणजेच या प्रकरणात कुठेतरी पाणी मुरत होता हे नाकारता येत नाही. सदर प्रकार महसूल विभागाच्या लक्षात आल्यानंतर जप्तीची कारवाई करण्यात आली हे येथे उल्लेखनीय आहे. बावनथडी नदीच्या काठावर ५ ते ६ रेती घाट अवैधरित्या सुरू आहेत.
हे रेतीघाट रेती चोरीसाठी अग्रेसर ठरत आहेत. या रेती घाटावरून दिवस रात्र रेतीची चोरी होत आहे. यामुळे गावकरी वैतागले आहेत. दिवस रात्र ट्रॅक्टर ट्रॉलींचा आवाज हा गावकऱ्यांसाठी त्रासदायक झाला आहे. रेती चोरीवर आळा घालण्यासाठी पोलीस चौकीची मागणी होत आहे. रेती चोरी प्रकरणात जरी अहवाल सादर झाला असला तरी कारवाई कोणावर कंत्राटदारावर कि राईस मिल च्या संचालकांवर असा प्रश्न उपस्थित होत आहे. राईस मिलच्या परिसरात बिना परवानगी रेती ठेवणाऱ्या कंत्राटदारावरच कारवाई का करण्यात येऊ नये असा प्रश्न गावकरी उपस्थित करीत आहेत. या प्रकरणात महसूल विभाग कारवाई करणार किंवा नाही याकडे परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे.









