कमळाची फुले काढण्यासाठी गेलेल्या युवकाचा तलावात मृत्यू

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली:- लक्ष्मीपूजनासाठी कमळाची फुले काढण्यासाठी मित्रांसोबत तलावात गेलेल्या १९ वर्षीय युवकाचा तलावात बुडून करूण अंत झाल्याची दुर्दैवी घटना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दि. २१ ऑक्टोंबर २०२५ रोजी सायं. ६.३० वाजता निलज येथे घडली असून प्रतिक सुखदेव शेंडे (१९) असे या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मृत्यू आणि वाढदिवसाच्या दिवशी अंतिम यात्रा काढण्यात आली. साकोली तालुक्यातील निलज येथील प्रतिक शेंडे हा युवक आपल्या दोन मित्रांसोबत घरी लक्ष्मीपूजनासाठी कमळाची फुले आणण्यासाठी सायंकाळी आसोला तलावात गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने तो तलावातील वेलांमध्ये फसला. त्याच्या मित्रांनी त्याला काढण्यासाठी बरेच प्रयत्न केले, परंतु त्यात त्यांना यश आले नाही. अखेर त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

घटनेची माहिती कळताच त्याचे प्रेत तलावातून काढून पोस्टमार्टमसाठी साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. दि. २२ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता पोस्टमार्टम झाल्यानंतर पार्थिव नातेवाईकांना सोपविण्यात आले व दुपारी अत्यंत शोकाकूल वातावरणात निलज येथील स्मशानभूमित त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतक प्रतिक शेंडे हा साकोली येथील मनोहरभाई पटेल महाविद्यालयात बीएससीला शिकत होता. अत्यंत सुस्वभावी असलेल्या प्रतिकच्या कुटुंबात गरीब आई-वडील व एक मोठा भाऊ आहे. विशेष म्हणजे २२ ऑक्टोबरला त्याचा वाढदिवस असल्याने त्याच्या मित्रांनी त्याच्या वाढदिवसाची तयारी केली होती. ऐन दिवाळी आणि वाढदिवसाच्या दिवशी त्याची अंत्येष्टी करावी लागल्याने त्याच्या कुटुंबावरच नव्हे तर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *