भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा सचिव प्राचार्य “राहुल डोंगरे’ यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसरः- दीपावली मिलन सोहळ्याच्या औचित्याने आज भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा सचिव तथा शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय, तुमसरचे प्राचार्य राहुल डोंगरे यांनी गोंदिया येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या वेळी मा. प्रफुल्ल पटेल (माजी केंद्रीय मंत्री व खास), मा. राजेंद्र जैन (माजी आम.) यांच्या हस्ते राष्ट्रवादीच्या दुपट्ट्याने व पुष्पगुच्छ देऊन डोंगरे सरांचे स्वागत करण्यात आले. गरीबीच्या पार्श्वभूमीवर शिक्षणाचा दिवा पेटवणारे, बुद्ध, शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांनी आपले आयुष्य घडवणारे, विद्यार्थ्यांच्या डोळ्यात स्वप्नं आणि समाजात परिवर्तनाचा उजेड निर्माण करणारे प्राचार्य राहुल डोंगरे हे केवळ शिक्षक नाहीत, तर विचारवंत आणि परिवर्तनाचे वाहक आहेत.
ज्ञान, विचार आणि प्रबोधन हेच ज्यांचे धर्मकार्य. शेकडो व्यासपीठांवरून सत्य, समता आणि न्यायाचे मंत्र उच्चारणारे हे व्यक्तिमत्त्व आता नव्या राजकीय अध्यायाची सुरुवात करत आहे. विश्वास, नेतृत्व आणि परिवर्तन या तिन्ही आधारस्तंभांवर उभा राहून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून समाजकारणाच्या नवा पर्वाला प्रारंभ केला आहे. या प्रसंगी मा. राजू कारेमोरे (आम. तुमसर-मोहाडी), राष्ट्रवादी काँग्रेसचे तुमसर तालुका अध्यक्ष देवचंद ठाकरे, शहर अध्यक्ष योगेश सिंगनजुडे, अल्पसंख्याक सेल तुमसर चे अध्यक्ष यासीन छवारे, संकेत गजभिये तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या प्रवेशानंतर त्यांच्या समर्थकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला असून, विचारांच्या प्रवासाला आता नवी दिशा मिळाली अशा शब्दांत सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.









