“येथे’ गुराख्याच्या अंगावरून धावली दीडशे गायी
दै. लोकजन वृत्तसेवा पालोरा (करडी) :- बलीप्रतीपदेच्या दिवशी विवीध पध्दतीने गोधनाची पूजा सर्वत्र केली जाते. परंतु जमिनीवर पालथे झोपून अंगावरून संपुर्ण गोधन चालवून घेण्याची अनोखी परंपरा मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथिल शेतकऱ्यांनी १५२ वर्षांपासुन अखंडितपणे सुरू ठेवली आहे. बुधवारी दुपारी १२ वाजतापासुन २ वाजता पर्यंत चाललेल्या या चित्तथरारक गोधन पूजेत जांभोरा येथिल गुराखी विनायक सुरेश परतेकी (३५) यांच्या अंगावरून १५० गायींचा कळप चालून गेल्यानंतरही तो सुखरूप आहे. त्याला कोणतीही दुखापत, इजा झाली नाही. गोमातेमुळेच आपण सर्व जिवंत आहोत. तीचे ॠण फेडण्यासाठी आम्ही तिच्या चरणाखाली स्वतः ला वाहून घेतो. यात काहीच वावगे नाही, हा अंधश्रद्देचाही प्रकार नाही.
आमच्या पणजोबापासुन ही प्रथा सुरू आहे, आणी ती कायम ठेवणे आमचे कर्तव्य आहे, असे तो हसतमुखाने सांगतो. मोहाडी पासुन ३५ किमी अंतरावर तालुक्याच्या टोकावर जंगल, पहाडाच्या कुशीत जांभोरा हे ४ हजार लोकंवस्तीचे गाव आहे. या गावात सर्व जाती धर्माचे लोकं गुण्यागोविंदाने राहतात. या गावात १०० टक्के शेतकरी असून त्या सर्वांकडे मिळून १५० ते २०० गायी आहेत. शेती करणे हा मुख्य व्यवसाय या गावात आहे. गावातील सर्व गायी चारायला नेण्याचे काम पिढ्यानपिढ्या परतेकी कुटुंबाकड़े आहे. १५२ वर्षापूर्वी गोधन अंगावरून चालवण्याची प्रथा परतेकी कुटुंबाने सुरू केली. गावातील सर्व गायींना आंघोळ घातली जाते.
शिंग रंगवून व नवीन गेटे, दावे बांधून त्यांना सजवीले जाते. तांदळाची खीर गायींना खाऊ घातल्यानंतर संपूर्ण गोधनाची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. ही मिरवणूक मुख्य चौकात आल्यानंतर गुराखी जमिनीवर पालथा झोपतो आणी संपूर्ण गोधन त्याच्या अंगावरून जाते. तरी देखील गुराख्याला कुठलीही इजा होत नाही. हा कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरातील गावातील लोकं जांभोरा येथे उपस्थित होतात. तसेच गावातील लोकंही याप्रसंगी सर्व भेदभाव विसरुन गोधन पूजेला उपस्थीत राहतात. १५१ वर्षांत गूराख्याला इजा झाल्याची घटना ऐकीवात नसल्याचे लोकं सांगतात.









