गोसेखुर्द प्रकल्पबाधित रस्त्यावर उतरले, महिला झाडावरही चढले

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- जिल्ह्यातील कारधा, करचखेडा, खमारी यासह २० गावांमधील प्रकल्पग्रस्त बाधितांच्या समस्या सोडवा, न्याय द्या या मागणीसाठी ६ ऑक्टोंबरपासून सुरू असलेले “आर-पार कायम निवासी आंदोलन’सुरु आहे. मंगळवारी तीन महिला जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाडावर चढल्या होत्या. रात्री ९.३५ वाजता त्या झाडावरून खाली उतरल्या होत्या. आज या प्रकल्पग्रस्त आंदोलकांनी रस्त्यावर बसून आंदोलन केले. काही महिला झाडावर चढल्या. यावेळी खा. प्रशांत पडोळे हे सुद्धा आंदोलकांसोबत रस्त्यावर बसल्याने काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे पोलिसांची वेळेवर तारांबडा उडाली.

प्रशासनाच्या वेळकाढू धोरणावर विश्वास नाही. यापूर्वी तीन वेळा शब्द देऊनही पाळला गेला नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सवरून आमच्या मंडपात चर्चा करून प्रश्न सोडवावा, तोपर्यंत आंदोलन कायम राहील असा प्रवित्रा आंदोलकांनी घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांचा पेंडाल असून सुमारे २०० वर आंदोलक गावागावातून मुक्कामी सहभागी आहेत. तेथेच स्वयंपाक करून आंदोलक जेवणही करीत आहेत. जिल्हाधिकारी यांनी आंदोलकांशी चर्चा करून पालकमंत्र्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. आज पालकमंत्री डॉ. पंकज भोयर हे जिल्ह्यात येणार होते. ते येण्यापूर्वीच आंदोलक रस्त्यांवर बसले तर काही महिला झाडावर चढल्या. विशेष म्हणजे या वेळी खा. डॉ. प्रशांत पडोळे हे सुद्धा आंदोलकांसोबत रस्त्यावर बसले. त्यामुळे काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. शेवटी पोलिसांनी प्रकल्पग्रस्तांना पालकमंत्री आल्यानंतर बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी रस्ता मोकळा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *