हरदोली – दावेझरी मार्गाची व्यथा; नागरिकांची गैरसोय निधीची कमतरता
दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- हरदोली – दावेझरी मार्गावरील खडीकरण व डांबरीकरणाचे काम दोन महिन्यापूर्वी करण्यात आले होते. दावेझरी, आग्री ते चुलरडोह कडील काही भाग डांबरीकरणाने पूर्ण झाला असला तरी तो रस्ता दोन महिन्यातच खड्डेमय झाल्याचे तर हरदोली कडील भागात खडीकरण झाल्याचे वृत्त हाती आले आहे. हरदोली – दावेझरी वळण मार्गाचे काम निधीच्या कमतरतेमुळे अपूर्ण असल्याचे सांगीतले जात आहे. नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
डांबरीकरण मार्ग खड्डेमय झाल्यामुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहे. खड्ड्यात रस्ता की रस्त्यावर खड्डा असी गत या रस्त्याची झाली आहे. सिहोरा परिसरात मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत झालेल्या डांबरीकरण व देखभाल दुरुस्तीच्या कामाची विभागीय चौकशी झाली पाहिजे अशी नागरिकांची मागणी आहे. कंत्राटदार व यंत्रणेेच्या काम करण्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह कायम आहे.
कंत्राटदार व यंत्रणा निकृष्ट दर्जाचा काम करीत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. रस्ते हे दळण वळणासाठी महत्त्वाचे साधन आहे. उत्तम दर्जाच्या रस्त्याने गावाचा विकास होतो असे म्हटले जाते. रस्त्याच्या बांधकाम व दुरुस्तीसाठी शासन दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च करतो परंतु संबंधित यंत्रणेतील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची स्थिती जैसे थे असल्याचे हरदोली ते दावेझरी मार्गावर दिसून येते. एकीकडे डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्याकडे वाटचाल केली जात असली तरी ग्रामीण भागातीलरस्त्यांची स्थिती आजही स्वातंत्र्यपूर्व काळासारखीच असल्याचे दिसून येत आहे. रस्त्याच्या विकासासाठी केंद्र सरकारतर्फे प्रधानमंत्री ग्रामसडक योजना तर राज्य शासनातर्फे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील रस्ते मुख्य रस्त्याशी जोडली जात आहेत. परंतु मुख्य मार्गाचीच अवस्था दयनीय असल्याने तुमसर ते बपेरा मार्गावरील तसेच हरदोली ते दावेझरी रस्त्यावरील डांबरीकरण उखडून मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहन धारक खड्डे चुकविण्याच्या नादात बाजूने वाहन काढतात व त्यातच त्यांचा अपघात होतो हे नाकारता येत नाही.









