गट ग्रामपंचायतीच्या निवडणुका घ्या ; भास्कर सोनेवाने
दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- तुमसर तालुक्यातील गट ग्राम पंचायतच्या निवडणुका त्वरित घेण्यात याव्यात अशी मागणी चुल्हाडचे माजी सरपंच भास्कर सोनेवाने यांनी केली आहे. तुमसर तालुक्यात ९७ ग्रामपंचायती आहेत. त्यात मुदत संपलेल्या १८ गट ग्रामपंचायती आहेत. यात चुल्हाड, आंबागड, माढळ, गोंडीटोला, पिपरी चुनी, महालगाव, रेंगेपार (पांजरा), येदरबुची, आलेसुर, पिटेसुर, पिपरा, चिचोली, लेंडेझरी, तुळका, स्टेशन टोली, सुकळी(दे) पवनारखारी व कवलेवाडा या ग्रामपंचायतचा समावेश आहे. मुदत संपलेल्या गट ग्रामपंचायत मध्ये चुल्हाड ही सर्वात मोठी ग्रामपंचायत असुन लोकसंख्या ५ हजाराच्या घरात आहे.
या गावाची अजून पर्यंत वार्ड रचना झाली नसल्याने या १८ ग्रामपंचायतच्या निवडणुका होतील की त्या ग्रामपंचायतीवर प्रशासक बसविण्यात येईल ही चर्चा राजकीय वतुर्ळात चांगलीच जोर धरत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजणार असल्याच्या चर्चेने सरपंच पदाचे उमेदवार व राजकीय पुढारी आपल्या पसंतीच्या उमेदवाराबरोबर मोर्चे बांधणी करीत आहेत. अजून पर्यंत ग्रामपंचायतची वार्ड रचना झालेली नाही. तीऑक्टांेबर महिन्यात पूर्ण करून नोव्हेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या गट ग्रामपंचायतच्या निवडणुका घेण्यात याव्यात अशी मागणी सुद्धा भास्कर सोनेवाने यांनी केली आहे.
ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. विकास कामात तशेच शासनाच्या विविध व जनकल्याणकारी योजना राबविण्यात ग्रामपंचायतची महत्त्वपूर्ण भूमिका असते हे सत्य नाकारता येत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ग्रामपंचायत, नगर पंचायत, नगर पालिका महा नगर पालिका यांचा समावेश असून या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ३१ जानेवारीच्या आत किंवा ३१ जानेवारी पर्यंत घेण्यात याव्यात असे असताना सुद्धा याकडे दुर्लक्ष होत असल्याचे समजते.







