बहिणीला भेटून गावाकडे येत असलेल्या भावाचा शेतातील विद्युत करंटने मृत्यू

दै.लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा ः- बहिणीच्या गावावरून स्वगावी परत येत होता. रस्ता बरोबर नसल्याने शेतशिवारातून गावाकडे जात असतांना शेतातील विद्युत करंटला हात लागल्याने जागेवरच मृत्यू पावल्याची घटना मोहाडी तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या किसनपूर येथे घडली. गंगाधर प्रल्हाद उईके (वय ३२) रा. किसनपूर असे मृतकाचे नाव आहे. ही घटना दि. ४ ऑगस्ट रोजी रात्री ८.०० वाजताच्या नंतर घडली. सविस्तर असे की, गंगाधर उईके हा गोंदिया जिल्ह्यात राहत असलेल्या त्याच्या बहिणीला भेटायला गेला होता. भेट घेवून किसनपूर येथे परत येण्यासाठी तो तिरोडा येथून बसमध्ये बसला.

भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या काठावर असलेल्या व गोंदिया जिल्ह्यात येत असलेल्या सितेपार येथे तो सायंकाळी ७.३० वाजता बसमधून उतरला. गावाकडे जाण्यासाठी चांगला रस्ता नसल्याने तो शेतशिवारातून जात होता. त्यावेळी एका शेतकऱ्याने वन्य प्राण्यांपासून पिकाचे रक्षण करण्यासाठी विद्युत प्रवाह लावला होता. त्या प्रवाहाला गंगाधरचा स्पर्श झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती करडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोरक्षनाथ नागलोत यांना देण्यात आली. त्यानुसार ठाणेदार गोरक्षनाथ नागलोत आपल्या चमुसह घटनास्थळी दाखल झाले. मात्र घटनेचा स्थळ तिरोडा पोलीस स्टेशन हद्दीत येत असल्याने घटनेची माहिती ठाणेदार अमित वानखेडे यांना देण्यात आली.

घटनास्थळी तिरोडा पोलीस स्टेशनची चमु दाखल झाली. पंचनामा करून शासकीय रुग्णालय तिरोडा येथे शवविच्छेदन करण्यात आले. मृतकाच्या मागे आईवडिल, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी आहे. पुढील तपास तिरोडाचे इाणेदार वानखेडे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे. मोठा किसनपूर हे आदिवासी बहूल गाव असून जंगलव्याप्त आहे. भंडारा जिल्ह्यातील हे शेवटचे गाव आहे. या गावात काही वर्षापूर्वी नक्षलवादी सुद्धा आले होते. गावात फक्त सात कुटूंब असून ते आदिवासी आहेत. स्वातंत्र्याला ७५ वर्षे लोटूनही गावात जायला चांगला रस्ता नाही. त्यामुळेच ही दुर्दैवी घटना घडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *