तुमसर येथे शेतकरी भवन व विकासकामांसाठी ५ कोटींची मंजुरी
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांसाठी शेतकरी भवन उभारणीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आमदार डॉ. परिणय फुके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर राज्य सरकारने या कामासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या मंजुरीमुळे शेतकऱ्यांना आता बाजार समिती परिसरात मुक्कामाची सोय मिळणार असून, त्यांच्या हक्काचा निवारा उभारला जाणार आहे. राज्य सरकारने राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी मुक्कामाची सोय व्हावी आणि किमान आवश्यक मूलभूत सुविधा असलेले शेतकरी भवन उभारण्यात यावे, या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रस्ताव तयार करून पणन संचालनालय, पुणे येथे पाठविला होता.
या प्रस्तावाबाबत आमदार डॉ. परिणय फुके यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येत अखेर पणन संचालनालयाने ५ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे. या निधीतून शेतकरी भवनासह बाजार समिती परिसरातील विविध विकासकामेही हाती घेतली जाणार आहेत. शेतकरी भवन उभारणीचा विचार २०२३-२४ मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात मांडलेल्या योजनेतून पुढे आला. त्या वेळी राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये ङ्गराष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनङ्घ उभारण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर आमदार डॉ. फुके यांनी तुमसर बाजार समितीला सविस्तर प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
या निर्णयामुळे तुमसर व परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, बाजार समितीच्या संचालक मंडळासह शेतकऱ्यांनी आमदार डॉ. परिणय फुके यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. या संदर्भात आमदार डॉ. फुके म्हणाले, ङ्गशेतकऱ्यांना बाजार समितीत मुक्कामाची, विश्रांतीची आणि आवश्यक सुविधा असलेली जागा मिळावी, हा आमचा प्रयत्न होता. राज्य सरकारकडून मिळालेल्या निधीमुळे शेतकरी भवनासोबतच अनेक विकासकामांना गती मिळेल. यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पणनमंत्री जयकुमार रावल यांचे आभार मानतो.







