बायपास मार्गावर प्रवाशांची गैरसोय
दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- तुमसर ते सिहोरा-बपेरा बायपास मार्गावर प्रवाशांची गैरसोय होत आहे. बायपास मार्ग झाल्यामुळे प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे.तुमसर सिहोरा- बपेरा मार्गावरील कोणतीही बस शहराच्या मध्यभागातून ये – जा करीत नसल्यामुळे प्रवाशांना येजा करतांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्या मार्गावर ठिक ठिकाणी थांबा देऊन प्रवासी निवारे उभारण्यात यावीत अशी मागणी ग्रामपंचायत धनेगावचे माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते छगन भाऊ पारधी यांनी केली आहे. बपेरा-सिहोरा कडून तुमसर कडे जातांना मालवीय शाळा, तहसील कार्यालय, मेहेगाव फाटा, तुमसर टाउन व जुना बस स्टॉप याप्रमाणे थांबा होते. तर तुमसर वरून येतांना जुना बस स्टॉप, तुमसर टाउन, मेहेगाव फाटा, तहसील कार्यालय व मोठा बाजार याप्रमाणे होते. उन्हाळा असो की पावसाळा या थांब्यावर प्रवाशांना त्रास होत नसे हे थांबे त्रासदायक नव्हते. परंतु आता बायपास मार्गावर प्रवाशांची गैरसोय होत आहे.
कोट्यावधी रुपये खर्च करून बायपास मार्ग उभारण्यात आला परंतु अधिकृत बस थांबा व प्रवासी निवारे उभारण्यात आले नाही. तुमसर रामटेक मार्गावर उभारण्यात आलेल्या बस थांबा व प्रवासी निवारे प्रमाणेच तुमसर बपेरा बायपास मार्गावर उभारण्यात यावे अशी प्रवाशांची सुद्धा मागणी आहे. बपेरा – सिहोरा कडुन तुमसर कडे जाणाऱ्या बसला बायपास वळण मार्गापासून तर मेहेगाव फाट्यापर्यंत तर तुमसर वरून बायपास सिहोरा – बपेरा मार्ग येणाऱ्या बसला मेहेगाव फाट्यानंतर बपेरा वळण मार्गापर्यंत कुठेही थांबा नाही आणि थांबा असेलही तर वाहन चालक बस थांबवित नाही ही मोठी शोकांतिका आहे. त्या मार्गावर बसण्याची सोय नाही. अधिकृत बस थांबा व प्रवासी निवारा नाही. प्रवाशांनी पावसाळ्यात व उन्हाळ्यात कुठे थांबावे हा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे. अधिकृत थांबा व प्रवासी निवारे उभारले जात नाही तोपर्यंत हात दाखवा बस थांबवा हा उपक्रम वाहक व चालकांनी राबवावे असी समज सुद्धा आगार प्रमुखानी द्यावी अशीही मागणी होत आहे. प्रवाशांची गैरसोय व हित लक्षात घेता एसटी महामंडळाने बपेरा वळण मार्गापासून तर मेहेगाव फाट्यापर्यंत व मेहेगाव फाट्या पासून तर बपेरा वळण मार्गापर्यंत दोन्ही बाजूला अधिकृत बस थांबा देऊन प्रवासी निवारा उभारण्यात यावे अशी मागणी धनेगावचे माजी सरपंच छगन पारधी यांनी केली आहेे.







