एसटीच्या महिला वाहकाने शालेय विद्यार्थिंनीचे चक्क केस खेचले
दै. लोकजन वृत्तसेवा भंडाराः- शाळेतून गावाकडे परत येत असलेल्या एका शालेय विद्यार्थिनीला एसटीच्या एका महिला वाहकाने चक्क केस खेचून थांबविण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार भंडारा करडी मार्गावरील सुरेवाडा बसस्थानकावर घडली. विशेष म्हणजे या प्रकरणाची चित्रफित व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र त्या महिला वाहकाविरुद्ध संताप व्यक्त होत आहे. सविस्तर असे की, भंडारा डेपोची बस भंडारा येथून करडीकडे जात होती. या एसटीमध्ये प्रवाशांसह अनेक शालेय विद्यार्थिनी देखील होत्या. दरम्यान सुरेवाडा बसस्थानकावर बस थांबल्यानंतर विद्यार्थिनीच्या शालेय पासच्या शुल्लक कारणावरून एका महिला वाहकाने विद्यार्थिनीचा हात पकडून तिच्याशी अरेरावी करण्याचा प्रयत्न केला.
मात्र या विद्यार्थिनीने हात झटकून खाली उतरण्याचा प्रयत्न केला असता महिला वाहकाने चक्क विद्यार्थिनीचे केस खेचून तिला थांबविण्याचा प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार बघून प्रवासी देखील थक्क झाले. महिला वाहक या विद्यार्थिनींचे केस खेचून तिला ओढत असतांना विद्यार्थिनी वेदनेने रडू लागली. मात्र या महिला वाहकाला पाझर फुटला नाही. अखेर तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तिीने या महिला वाहकाचा हात धरून तिच्या तावडीतून विद्यार्थिनीची सुटका केली. या घटनेनंतर गोंधळाची स्थिती निर्माण झाली. ग्रामस्थांनी एसटी थांबवून महिला वाहकाला खाली उतरवले आणि तिथे विद्यार्थिनी सोबत केलेल्या वर्तनाबद्दल जाब विचारू लागले. विद्यार्थिीनीचे काही चुकले असेल तर तिला समज देता येईल किंवा तिची तक्रार करता आली असती. मात्र तिचे केस ओढून तिला शारीरिक इजा पोहोचविण्याचा अधिकार महिला वाहकाला आहे का असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला. एवढे झाल्यानंतरही या महिला वाहकाने तिचा हेका कायम ठेवला. त्यानंतर महिला वाहक आणि ग्रामस्थांनी विद्यार्थिनींच्या पालकांसह थेट कारधा पोलीस स्टेशन गाठले. कारधा पोलीस स्टेशनमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची तक्रार पोलिसांत केलेली नसली तरी सुरेवाडा ग्रामस्थांकडून विभाग नियंत्रक तनुजा अहिरकर यांना महिला वाहकाच्या विरोधात निवेदन देण्यात येईल, असे सांगण्यात आले.









