इथेनॉल वाहून नेणाऱ्या टँकरने दोघांना चिरडले, तुमसर जुना बसस्थानक परिसरातील घटना

तुमसर : जुना बस स्थानक परिसरात कटंगी वळण मार्गावर एकच दिशेने धावणाऱ्या इथेनॉल टँकरने दुचाकीस्वार दोघांना चिरडले. सदर अपघात शनिवार (२७) रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडला असून दुचाकी चालक नितीन रमेश गजभिये (४५) व मागे सोबत असलेली महिला वर्षा राजेश वासनिक (५३) दोघेही राह. गांधी नगर तुमसर हे टँकरच्या पुढील चाकात आले. अपघात दोन्ही जखमींचे उजवे पाय टँकरच्या पुढील चाकात आले.

सदर अपघात चौकात उपस्थित वाहतूक शिपायांच्या डोळ्यांलगत घडल्याने जखमींना तातडीने मदत मिळाली. अपघात घडताच घटनास्थळावर मदतीस धावणाऱ्यांची एकच गर्दी जमा झाली होती. जखमींना चाकाखालून काढून घेत तातडीने उपजिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. तर टँकर चालक रेहमान खान (२५, सुलतानपूर, प्रयागराज) यास तुमसर पोलिसांनी वाहन क्रमांक एमपी १५ झेडके २४७६ सह ताब्यात घेतले.
प्रत्यक्षीदर्शीच्या मते घटनेच्या वेळी जखमी खाजगी बँक कर्मचारी नितीन हा सहकर्मी महिला वर्षा हिच्यासोबत घरी निघाला होता. त्याच वेळी दोन्ही वाहन चालकांनी एकच दिशेला वळण घेतले. पोखरलेल्या रस्त्यावरील गिट्टीवरून नितीनची दुचाकी स्लीप झाली. त्यात नितीनच्या उजव्या पायाचा खालचा भाग टँकरच्या चाकात आला. त्यात पायाचा अक्षरशः चुराडा झाला तर वर्षाच्या उजव्या मांडीवरून चाक गेल्याने तिच्या पायाचे स्नायू अलगद फाटून लोंबकळत होते. दोघांनाही प्रथमोपचार करून नितीनला तातडीने नागपूर तर महिलेला गोंदिया येथे उपचारार्थ हलविण्यात आले.
मागील दोन दिवसांपासून तालुक्यात पावसामुळे जुन्या बस स्थानकातील रस्त्यावरील डांबर व मुरूम चांगलेच वाहून गेलेले आहे. त्यामुळे संपूर्ण चौकात खड्डेच खड्डे पडले आहेत. याच खड्ड्यांनी सदर अपघातात कायमचे अपंगत्व आल्याने स्थानिक प्रवासी चांगलेच धास्तावले आहेत. त्यामुळे चौकातील रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *