शेतकऱ्यांनी संघाला दूध पुरवठा करून आर्थिक उन्नती साधावी, अध्यक्ष विलास काटेखाये यांचे प्रतिपादन


*जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाची आमसभा
काशिनाथ ढोमणे
भंडारा : – निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय तांत्रीकदृष्ट्या फायदेशीर ठरत नसल्याने दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय होणे काळाची गरज आहे. खाजगी दुधाचा व्यवसाय करणाऱ्या अनेकांनी दुग्ध उत्पादकांना फसविले आहे. अशा वेळी दुग्ध उत्पादकांनी संघाला दुधाचा पुरवठा करून आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाचे जिल्हाध्यक्ष विलास काटेखाये यांनी केले.
भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी, संघाची २१ वी वार्षिक आमसभा आज दि. २९ सप्टेंबर रोजी मंगलम् सभागृह भंडारा येथे घेण्यात आली. यावेळी त्यांनी सभेसमोर बोलतांना वरील आवाहन केले.
व्यासपिठावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, अर्बन बँकेचे अध्यक्ष नानाभाऊ पंचबुद्धे, माजी खासदार मधुकर कुकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश महासचिव धनंजय दलाल, महेंद्र गडकरी, धनराज साठवणे, महादेव पचघरे, नरेश धुर्वे, संचालक आशिष पातरे, मनोहर लंजे, हितेश सेलोकर, विलास शेंडे, नरेश पोटफोडे, विवेक पडोळे, आशिष मेश्राम, शरद कार, मुकुंदा अगासे. सौ. अस्मिता शहारे, सौ. अनिता तितीरमारे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
विलास काटेखाये पुढे म्हणाले, आमिष दाखवून दुध घेणारे व नंतर वेळेवर पेमेंट न करणाऱ्या अनेक संस्था आहेत. मात्र संघ नियमितपणे पेमेंट देत आहे. या तीन महिन्यात दुधाचा पुरवठा कमी असतो. त्यातच हिंदूचे सण असतात. दुधाची मागणी जास्त, पुरवठा कमी अशी परीस्थिती असते. मात्र खर्च तेव्हाच आहे. उत्पादन कमी, खर्च जास्त अशी परिस्थिती आहे. ६० ते ७० लाख रुपये प्रति महिना संघाचा खर्च आहे. सध्या संघाचा सुगंधीत दुध, हलवा राज्याबाहेर जात आहे. २ कोटी ५६ लाखाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे दिला आहे. आ. परिणय फुके यांच्या मध्यस्थीने तो लवकरच पारीत होईल, असेही ते म्हणाले.
यावेळी आमसभेत मांडण्यात आलेल्या विषयाला सर्वानुमते मंजूरी देण्यात आली. यात ताळेबंद, व्यापारी पत्रक, नफातोटा पत्रक अहवाल मंजूर व कायम करणे, ज्यादा आलेल्या खर्चास मंजूरी देणे यासह अध्यक्षचांच्या परवानगीने आलेल्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
सभेचे संचालन व आभार प्रदर्शन कार्यकारी संचालक करण रामटेके यांनी केले. सभेच्या यशस्वीतेसाठी दुग्ध उत्पादक संघाचे पदाधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.

*संघाने खर्चात कपात करावी- सुनील फुंडे*
संघाचा फायदा कमी व खर्च जास्त होत आहे. अशावेळी संघाने खर्चात कपात करावी, वाहतुकीवर खर्च कमी करावे, रोजंदारी माणसे कमी करावी, दुग्ध संघाच्या फायद्यासाठी कठोर निर्णय घ्यावे, संस्थाची दुधात होणारी भेसळ थांबवावी, त्यात दर्जेदार दूध व कमी दर्जेदार दूध अशी विभागणी करून दुध विकत घ्यावी, अवकाळी पावसामुळे राज्य सरकारचा बजेट कोलमडणार आहे. जिल्हयातही अवकाळीची परिस्थिती निर्माण आलो आहे. तेव्हा शासनाने कर्जमुक्ती करून शेतकन्यांना प्रोत्साहन राशी द्यावी, अशीही मागणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी केली.







