महसूल कर्मचाऱ्यांचे तहसिलदार भंडारा विरुध्द आंदोलन
दै. लोकजन वृत्तसेवा भंडाराः- जिल्हयातील महसूल कर्मचारी यांचा श्री संदीप माकोडे, तहसीलदार, भंडारा यांचे विरोधात संताप उफाळुन आला असून सर्व कर्मचारी यांनी एकजूट दाखवत तहसिलदार, भंडारा यांचे विरुध्द तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल याबाबत जिल्हाधिकाऱी, भंडारा यांना निवेदन सादर केले आहे. सविस्तर वृत्त असे की, संदीप माकोडे हे कर्मचाऱ्यांशी नेहमीच एकेरी व अरेरावीच्या भाषेत दमदाटी करुन बोलत असल्यामुळे कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होत असल्याचा आरोप करत सदर अधिकारी यांचे विरुध्द तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल.
याबाबत राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य तसेच महसूल कर्मचारी संघटना यांनी मा. जिल्हाधिकारी, भंडारा यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. संदीप माकोडे यांनी यापुर्वीही सरपंच संघटेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत सुध्दा वरील प्रमाणेच उध्दट वागणूक केल्यामूळे सेवा पंधरवडा कार्यक्रमावर बहीष्कार टाकणार असल्याबाबतची चर्चा आहे. यावर महसूल प्रशासन वृत्ताची दखल घेत सदर अधिकाऱ्याविरुध्द कोणती कार्यवाही करणार यावर सर्वांचे लक्ष लागलेले आहे.







