पिटेझरी येथे ५० च्यावर सागवनाची अवैध कत्तल
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- नागझिरा वन्यजीव विभागाच्या पिटेझरी येथे गेल्या चार-पाच महिन्यांपासून सागवनाची कत्तल सुरू आहे. बॅरल गेट, फरसनाला परिसर, सोनारगाडी, मामाभाशा परिसर, दमाही, मोठा नाला परिसर येथील सुमारे ५० ते ६० सागवन लाकूड कापण्यात आले आहेत. यासंदर्भातील तक्रार नवेगावनागझिरा टायगर रिझर्व्ह फॉरेस्टचे क्षेत्र संचालक यांच्याकडे करण्यात आली आहे.
चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. वन्यजीव भागातील कोणतीही लाकडे कापता येत नाहीत. साधी सुकलेली लाकडेही बाहेर नेण्यास मनाई आहे. असे असताना कोणतीही शासकीय प्रक्रिया पार न पाडता ही अवैध वृक्षतोड करण्यात आली आहे.खांबा पहाडी कॅम्प येथे लाकूड कापण्याचा आरा सापडला. त्याची तक्रार वनपरिक्षेत्र अधिकारी बारसागडे यांच्याकडे करण्यात आली. परंतु, त्यांनी संबंधितांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. त्यामुळे कुपंणच शेत खात असल्याची चर्चा या परिसरात आहे. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या चार महिन्यात ही अवैध वृक्षतोड झाली आहे.







