भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थी देणार रमण सायन्स सेंटर व इस्त्रोला भेट
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- जिल्हयातील विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेणारे व त्यातुन जिल्हा तसेच राज्य व राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट काम करणाऱ्या विदयार्थ्याना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांना रमण सायन्स सेंटर, इस्त्रो व नासासारख्या संस्थाची शैक्षणिक क्षेत्रभेट आयोजित करण्यात येईल,असे सुतोवाच भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्यमंत्री शालेय शिक्षण विभाग डॉ. पंकज भोयर यांनी आज केले. जिल्हा परिषद भंडारा व शिक्षण विभागाच्यावतीने जिल्हा शिक्षक पुरस्कार समारंभ तसेच फेब्रुवारी/मार्च २०२५ मध्ये झालेल्या शालांत परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ अखिल सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार राजु कारेमोरे, माजी खासदार सुनिल मेंढे, जि.प चे सभापती नरेश ईश्वरकर, शितल राऊत, आनंद मलेवार, अनिता नलगोपुलवार, रसिका रंगारी, गटनेता विनोद बांते, जि. प. सदस्य यशवंत सोनकुसरे यांच्या सह जिल्हाधिकारी सावनकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींदकुमार साळवे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते बारावीच्या तालुकास्तर व जिल्हास्तर विज्ञान प्रदर्शनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमाठी हा एक महत्वाकांक्षी व प्रेरणादायी उपक्रम असुन त्यातुन भावी वैज्ञानिकांची पायाभरणी भंडारा जिल्ह्यातून होईल असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. शिक्षण तसेच आरोग्य या क्षेत्रात सर्वांच्या सहयोगाने चांगले काम करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. जनता दरबाराच्या माध्यमातुन सामान्य नागरिकांचे प्रश्न जलद गतीने सोडविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. नुकतेच राज्य शासनाकडुन ११४ कोटीचा निधी भंडारा जिल्हयाला प्राप्त असुन तो लवकरच धान उत्पादकांना वर्ग करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या क्षेत्रभेटीमध्ये सात तालुकास्तरावरून प्रथम २१ विदयार्थ्यांची निवड करून त्यांना सी. व्ही. रमण सेंटर नागपूर येथे तर जिल्हा प्रदर्शनात उत्कृष्ट ५१ विदयार्थ्याना इस्त्रो भारतीय अंतराळ संशोधन संस्था, बंगलोर येथे तर राज्य स्तरावरील ५१ उत्कृष्ट विद्यार्थ्याना नासा संस्था, अमेरीका येथे क्षेत्रभेटीला नेण्यात येईल. विशेष म्हणजे बेंगळूरु येथे विद्यार्थ्यांना विमानाने नेण्यात येणार आहे.









