पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घ्यावा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- केंद्र शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम-स्वनिधी) योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी कर्ज कालावधी वाढविण्यात आला असून आता तो ३१ मार्च २०३० पर्यंत करण्यात आला आहे. यापूर्वी हा कालावधी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंतच मर्यादित होता. कालावधी वाढल्यामुळे भंडारा शहरातील फेरीवाले, लघुउद्योजक व कुटुंबांना या योजनेचा लाभ घेणे अधिक सोयीचे ठरणार आहे. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भंडारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांनी केले आहे. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील कर्ज मर्यादा पूर्वी १० हजार रुपये इतकी होती ती आता १५ हजार रुपये करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील कर्ज मर्यादा २० हजारांवरून २५ हजार रुपये करण्यात आली असून, तिसऱ्या टप्प्यातील कर्ज मर्यादा ५० हजार रुपये एवढी निश्चित करण्यात आली आहे.

याशिवाय, योजनेचा लाभ घेणाऱ्या आणि वेळेवर हप्ता परत करणाऱ्या फेरीवाल्यांना यूपीआय-लिंक्ड रूपे क्रेडिट कार्ड देण्यात येणार आहे. त्याद्वारे अचानक उद्भवणाऱ्या व्यवसायिक व वैयक्तिक गरजांसाठी तत्काळ आर्थिक मदत मिळू शकेल. तसेच डिजिटल व्यवहारांवर १,६०० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळण्याची सुविधाही आहे. या माध्यमातून फेरीवाले व लघुउद्योजकांना डिजिटल पद्धतीने व्यवसाय करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. योजनेतर्गत फेरीवाल्यांना उद्योजकता, आर्थिक साक्षरता, डिजिटल कौशल्ये आणि मार्केटिंग या विषयांवर विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.

तसेच शहरातील स्ट्रीट फूड विक्रेत्यांसाठी भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाच्या साहाय्याने स्वच्छता व अन्नसुरक्षा प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. शहरातील फेरीवाले, हातगाडीधारक व छोटे उद्योजक यांनी केंद्र शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घ्यावा. यामुळे आर्थिक सशक्तीकरणाबरोबरच डिजिटल व्यवहारांमुळे त्यांच्या व्यवसायाला नवे दालन खुले होईल. त्यामुळे भंडारा शहरातील पात्र नागरिकांनी तात्काळ आधार शहर उपजीविका केंद्र, मिस्किन टँक गार्डन परिसर, भंडारा येथे संपर्क साधावा, असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *