३५ किलो गोमांस जप्त; आरोपी फरार

 दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तुमसर शहरात गोरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जाणारी कारवाई १७ सप्टेंबर रोजी पोलिसांनी दुपारी केली. येरली रोड, दत्तात्रेयनगर येथे राहणाऱ्या इरफान अली हसन अली सैयद (४५) याच्या घरावर छापा टाकण्यात आला. या छाप्यात ३५ किलो गोमांस (किंमत ७ हजार रुपये), इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, दोन लोखंडी काते, सुंबा व लाकडी टिपला असा एकूण ९ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईचे नेतृत्व साहाय्यक पोलीस अधीक्षक मयंक माधव यांनी केले. पीएसआय धर्मेंद्र बोरकर, पीओ धर्मेंद्र भोंडेकर, पोशि. रविकुमार आडे व महिला पोशि. सुनीता ढबाले यांचे पथक सहभागी होते.

ही मोहीम पोलीस अधीक्षक नुरूल हसन व अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यातआली. याप्रकरणी तुमसर पोलीस ठाण्यात अपराध क्र. ६२२/ २०२५ नोंद झाला असून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ९, ९ (अ), तसेच भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

पुढील तपास सुरू आहे. मात्र कारवाई दरम्यान आरोपी हात धुण्याच्या बहाण्याने पोलिसांच्या नजरेतून पसार झाला. घटनास्थळी पाच अधिकारी उपस्थित असताना आरोपीचे पलायन कसे शक्य झाले, हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. ही चूक, दुर्लक्ष की यामागे काही वेगळे कारण दडले आहे, याचे उत्तर तपासातून स्पष्ट होणार आहे. या प्रकारामुळे गोमांस जप्तीसोबतच पोलिसांच्या भूमिकेबाबत नागरिकांमध्ये संशय निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *