शेतकऱ्याचे थकितधानाचे चुकारे त्वरीत द्या
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा जिल्हयातील शेतकऱ्यांचे प्रमुख उत्पादन धान हेच असल्यामुळे उत्पादित केलेला धान शासनाकडे, व्यापाऱ्यांकडे विकुन मिळालेल्या पैशातून शेतकरी बांधव भविष्याची स्वप्ने रंगवित असतो. परंतु मागील रब्बी हंगामातील उन्हाळी धान चार महिन्यापूर्वी शासनाला देवुनही अद्यापही पैसे न मिळाल्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये शेतकरी बांधव हवालदिल झाल्यामुळे शासनाने शेतकरी बांधवाचे धानाचे, बोनसचे पैसे त्वरित त्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) या निवेदनाद्वारे करीत आहे.
कृषी प्रधान असलेल्या आपल्या देशामध्येच शेतकरी बांधवांची दयनीय अवस्था झालेली असली तरी राज्यकर्त्यांना शेतकरी बांधवांच्या वेदना दिसु नयेत हेशेतकऱ्यांच्याच नव्हे तर राज्याचे, देशाचे दुर्भाग्यच असुन राज्यकर्ते मात्र निवडणुकीआधी भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांना कुरवाळून, त्यांना कर्जमुक्ती सारखे स्वप्न दाखवून, खोटी आश्वासने देवून सत्तेमध्ये येतात आणि नंतर मात्र दिलेल्या आश्वासनापासून दूर पळून शेतकरी बांधवांना मुर्ख बनविण्याचेच काम करीत आहेत. जिल्हयातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी उन्हाळी धान शासनाच्या विविध धान खरेदी केंद्राला एप्रिल महिन्यापासून धान दिले.
राज्य शासनाने जिल्ह्यातील २०० हून अधिक असलेल्या धान खरेदी केंद्रातून जवळपास १९ लक्ष क्विंटल धान खरेदी केले. त्यापोटी शासनाला धानाचे व घोषित केलेल्या बोनसचे अंदाजे ४२५ करोड रू. देणे असतांना राज्य शासनाने आतापर्यंत फक्त २३५ करोड रूपयेच जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिल्यामुळे मागील चार ते पाच महिन्या अगोदरपासून खरेदी केलेल्या धानाचे व बोनसचे मिळून अद्यापही जवळजवळ २०० करोड रू. हून अधिक पैसे बाकी आहेत. त्यामुळे संपूर्णपणे शेतीवर अवलंबुन असलेल्या जिल्हयातील शेतकरी बांधवांना शासनाने अशाप्रकारे वेठीस धरल्यामुळे शेतकरी बांधवअडचणीत सापडला असुन चालु हंगामात धानाचे चांगले पीक हातात यावे यासाठी रासायनिक खते, औषधीसाठी पैसे नसल्यामुळे शासनाच्या धोरणामुळे शेतकरी बांधव हतबल झाला असुन, चालू हंगामातील पीक हातातून जाणार तर नाही ना ? अश्या भितीमध्ये सध्या जगत आहेत.
जिल्हयातील जनप्रतिनिधींना शेतकऱ्यांच्या या अडचणीकडे लक्ष द्यायला वेळ नाही, ते केवळ टक्केवारी मध्येच गुंतलेले असुन धानाला बोनस जाहीर झाल्यानंतर त्याचे क्रेडीट घेवून मोठमोठे बॅनर लावून प्रसिध्दी मिळिवणारे जिल्ह्यातील नेते यांना सुध्दा धानाचे व बोनसचे पैसे अद्यापही शेतकरी बांधवांना मिळाले नसले तरी त्यावर चकार शब्द काढायला तयार नाहीत. एकीकडे राज्य शासन गरज नसतांना हजारो करोड रूपये स्वतःच्या जाहिरातीवर खर्च करते. परंतु शेतकऱ्यांचे चुकारे द्यायला त्यांच्याकडे पैसे नाहीत यावरून सध्याचे सरकार हे शेतकरीविरोधी भुमिकेतून काम करीत असल्याचे स्पष्ट जाणवते. त्यामुळे येत्या आठ दिवसांमध्ये दसऱ्यापूर्वी जिल्हयातील शेतकरी बांधवांचे धानाचे थकित चुकारे व बोनस त्यांच्या खात्यात जमा करावेत अन्यथा शेतकऱ्यांची होणारी अडचण लक्षात घेता शिवसेना आंदोलनाच्या पवित्र्यात असेल, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे,उपजिल्हाप्रमुख किशोर तलमले, पवनी तालुकाप्रमुख होमराज उपरीकर, शहर प्रमुख राकेश आग्रे,निलेश चामट, प्रशांत वैद्य,संदीप गभणे, कुंदन चौधरी, सुशील बावणे,श्यामदेव हटवार,हरीश लांजेवार,जितेंद्र अहिरवार,सचिन थोटे इत्यादी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे. सदर निवेदनाची प्रत सहकार पणन वस्त्रोद्योग मंत्री तसेच शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव साहेब यांना पाठविलेली आहे.









