साकोलीत एका रात्रीत पाच दुकाने फोडली : व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- शहरात पुन्हा एकदा भुरट्या चोरांचा धुमाकूळ पाहायला मिळाला. १९ सप्टेंबरच्या मध्यरात्री प्रगती कॉलनी चौक, नर्सरी कॉलनी व जुन्या पंचायत समिती परिसरातील पाच दुकानांची शटर फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल २३,५०० रुपयांची रोकड लंपास केली. यामध्ये पेंट दुकान, मेडिकल व किराणा दुकाने अशी विविध ठिकाणे चोरट्यांनी टार्गेट केली. या घटनेत साईराम ट्रेडर्समधून २,००० रुपये, गायत्री मेडिकलमधून १०,००० रुपये, आदित्य जेनरिक मेडिकलमधून ७,००० रुपये, अन्नपूर्णा किराणा दुकानातून १,००० रुपये तर अग्रवाल किराणा दुकानातून ३,५०० रुपये असा ऐवज चोरट्यांनी उचलला.

विशेष म्हणजे व्यापाऱ्यांनी पोलिसांत अधिकृत तक्रार नोंदवलेली नसल्याने तपासाची दिशा धूसर झाली आहे. याआधी ८ सप्टेंबर रोजी तब्बल १.५० लाखांची रोकड गाडीतून चोरीस गेल्याची घटना अद्याप सुटलेली नाही. सलग चोरीच्या घटनांनी व्यापारी वर्गात प्रचंड भीती व संतापाचे वातावरण आहे. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, व्यापाऱ्यांकडून तक्रारी न आल्याने चोरांचे मनोबल अधिकच वाढले आहे. शहरवासीयांनी आता पोलिस प्रशासनाकडून कडक कारवाईची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *