खैरी वलमाझरी पासून पिटेझरी व आमगाव ग्रामपंचायत वेगळे करण्याच्या प्रस्ताव सादर
दै. लोकजन वृत्तसेवा साकोली:- खैरी वलमाझरी गट ग्रामपंचायतचे सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे यांनी सामान्य जनतेला लहान मोठ्या कामासाठी होणारी पायपीट थांबावी म्हणून गट ग्रामपंचायत मध्ये असलेले चार गाव वेगवेगळे करून दोन ग्रामपंचायतीच्या वेगळा प्रस्ताव सादर करून एक प्रामाणिक व जनहितार्थ काम करून एक आदर्श निर्माण केला आहे. स्वच्छ सुंदर व हरित गटग्रामपंचायत खैरी वलमाझरीच्या विभाजनाचा ठराव ग्रामपंचायतने पारित केला असून विभाजनाचा प्रस्ताव साकोली येथील गटविकास पुंडलिक जाधव यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. खैरी वलमाझरी गटग्रामपंचायत अंतर्गत पिटेझरी व आमगाव/खुर्द ही दोन्ही गावे सध्या एकाच ग्रामपंचायतमध्ये समाविष्ठ असून महसूली गावे म्हणून अस्तित्वात आहेत.
या दोन्ही गावांचा विचार करता ग्रामस्थांच्या मागणी प्रमाणे सरपंच पुरुषोत्तम रूखमोडे यांच्या नेतृत्वात स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापनेचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. सन २०११ जनगणनेनुसार पिटेझरी व आमगाव (खु.) या गावांची लोकसंख्या पिटेझरी ५७९ व आमगाव (खु.) ६६२ एकूण १२४१ लोकसंख्या असून स्वतंत्र ग्रामपंचायती साठी आवश्यक अट पूर्ण होते. सध्या या दोन्ही गावांचे मुख्यालयापासून अंदाजे अंतर तीन कि. मी. पेक्षा जास्त आहे. या दोन्ही गावांचे दरडोई उत्पन्न हे नविन ग्रामपंचायतला अनुकुल असे आहे. जनतेला ग्रामपंचायत सबंधित प्रशासकिय कामे करण्यास व लागणारे दाखले व कागदपत्रांसाठी चकरा मारण्यात शारीरीक व मानसिक त्रास होऊन अनेक अडचणी येतात.
पिटेझरी हे गाव आदिवासी बहुल असून सुध्दा स्वतंत्र ग्रामपंचायत नसल्याने शासकिय योजना व सुविधा गावापर्यंत पोहचत नाही. पिटेझरी व आमगाव (खु.) ही गावे भौगोलीक दृष्ट्या जवळ असल्यामुळे ही दोन गावे मिळून स्वतंत्र ग्रामपंचायत च्या कारभार चालविणे सोईचे व परीणाम कारक ठरेल. या सर्व गोष्टींचा विचार करता ग्रामपंचायत स्वतंत्र झाल्यास सर्व शासकीय योजना सवलती वापरून गावाचा व गावातील गरीब जनतेचा सर्वकष सर्वांगीण विकास करता येईल. तसेच मौजा पिटेझरी व आमगाव (खु) लोकसंख्या व अंतर निकषाप्रमाणे स्वतंत्र ग्रामपंचायत होण्यास पात्र असल्याने शासन स्तरावर खैरी/वलमाझरी ग्रामपंचायतचे विभाजन करून पिटेझरी व आमगाव खुर्द या दोन गावामिळून स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करण्याची विनंती या निवेदनात करण्यात आली असून विभाजन न झाल्यास येत्या ग्रामपंचायत निवडणूकीवर बहिष्कार घालण्यात येईल असा इशारा या पत्रातून देण्यात आला आहे.







