विज्ञान व गणित शिक्षकांसाठी झाले पालक आक्रमक
दै. लोकजन वृत्तसेवा मोहगाव देवी :- येथील महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल मोहगाव देवी येथे गणित व विज्ञान विषयांचे नियमित शिक्षक नसल्यामुळे (गुरुवार दिनांक १८ सप्टेंबरला) पालकांनी धडक दिली. विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे या कारणांवरून पालक संतप्त झाले होते. मोहगाव देवी येथील महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूलमध्ये मागील तीन वर्षापासून गणित विषयांचा नियमित शिक्षक नाही. तसेच विज्ञान शिक्षकांच्या सेवानिवृत्तीमुळे पद मागील मार्च महिन्यापासून रिक्त आहे. विज्ञान विषयांचा शिक्षक नियमित नाही. शाळेने कंत्राटी तत्वावर विज्ञान शिक्षकेची कौशल्य विकास विभागातर्फे नियुक्ती केली आली होती. परंतु त्यांच्या कार्यकाळ १५ सप्टेंबरला संपला असल्यामुळे आता विज्ञानविषयांच्या शिक्षकच नाही.
शाळेने तात्पुरती सोय म्हणून एका महिला गणित विषयाच्याशिक्षकेची औपचारिक रित्या नियुक्ती केली आहे. परंतु, त्या शिक्षिका नियमित येत नाही. शिकवलेले विद्यार्थ्यांना समजत नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या कारणांवरून बोथली व मोहगाव देवी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य निखिल काळे, मुकेश साठवणे, रोशन माकडे, विनोद लेंडे, सुनील बावनकर, मालती लांबट, ललिता चकोले, किरण वाडीभस्मे, सुषमा शिवणकर, पौर्णिमा चकोले, माधुरी शिवणकर, दुर्गा बालपांडे, अनिता लेंडे, शंकर लांबट, गीता लेंडे, हिरालाल डोकरीमारे, प्रभाकर बाळबुधे, गुरुदेव बाबरे, विद्याबाबरे, राजू वाडीभस्मे, दिनकर डोकरीमारे, प्रमोद लेंडे, मोहित बुरडे, नरेंद्र चकोले, निलेश बाबरे, सुरेखा साखरवाडे आदी तीसपस्तीस पालकांनी दुपारी एक वाजता शाळेत मोर्चा काढला होता. पालकांनी वर्गात जाऊन विद्यार्थ्यांची शिक्षणाविषयी विचारपूस केली. परंतु शिक्षक व पालकांपुढे विद्यार्थी बोलायला घाबरत असल्याचे दिसून आले.काही विद्यार्थ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर संस्थेच्या एका पदाधिकाऱ्यांनी मागील वर्षी गणित, विज्ञान, हिंदी शिकवण्याचे आश्वासन दिले होते पण, त्यांनी आश्वासन पाळले नाही असे विद्यार्थ्यांनी सांगितले.







