ठोक भाजी बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीत स्थानांतरीत करा- मुख्याधिकारी
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर:- नगरपरिषद कार्यक्षेत्रामध्ये आठवडी व गुजरी बाजार पुर्वापार पासुन तुमसर रोडाच्या आजुबाजुला भरत आहे. सध्या ठोक बाजार व फळ बाजार हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भरत असुन त्यामुळे वाहतूक कोंडीमुळे नागरीकांना होणारा त्रास वाढत आहे. याबाबत नागरीकांचे निवेदन नगरपरिषदेला प्राप्त झाले असुन भाजी व फळ बाजार, कृषी बाजार समिती तुमसर येथे स्थानांतरीत करा असे आदेश मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी दिले आहे.
किरकोळ फळ व भाजी बाजार नगर परिषदेतील आठवडी या ठिकाणी भरणे अपेक्षीत असून सदर परिस्थीतीचा विचार करता नगर परिषद क्षेत्रातील बोस नगरयेथील दररोज भरणाऱ्या ठोक भाजी व फळ बाजार इंतर ठिकाणी स्थालांतरण करणे आवश्यक आहे. तसेच सदर भाजी व फळ ठोक लिलाव व बाजार नियमानुसार शेतमाल असल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरामध्ये भरणे आवश्यक आहे. त्यामुळे येत्या दिनांक १५ सप्टेंबर २०२५ पासुन सदर भाजी व फळ ठोक लिलाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात करावे, असे निर्देश भाजी बाजार व्यापाऱ्यांना मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी नोटिसच्या माध्यमातून दिले आहे.







