“गोंडगोवारी’ जमातीच्या लोकांनी आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर यावे
दै. लोकजन वृत्तसेवा साकोलीः- महाराष्ट्रातील गोंड गोवारी जमातीला अनुसूचित जमातीचा घटनात्मक दर्जा आणि त्यासोबतचे सर्व हक्क पुर्ववत मिळावेत, या प्रमुख मागणीसाठी आदिवासी गोंड गोवारी जमात संवैधानिक हक्क संघर्ष कृती समिती, महाराष्ट्र पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन संघर्ष कृती समितीचे राज्य कार्यकारी संयोजक विजय वाघाडे यांनी सर्व जमात बांधव, भगिनी/युवा युवतींना केले आहे.
संघर्ष कृती समितीने दिलेल्या माहितीनुसार, येत्या १८ सप्टेंबर २०२५ रोजी नागपूर येथील संविधान चौकात तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.शासनाने गेल्या अनेक वर्षापासून गोंड गोवारी’ जमातीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने आणि वेळकाढू थोरण स्वीकारल्याने हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. विजय वाघाडे यांनी जमातीच्या सर्व लोकांना आवाहन करताना म्हटले आहे की, आपल्या घटनात्मक अस्तित्वाच्या हक्कांसाठी लढत असलेल्या या आंदोलनाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. ही केवळ एका जमातीची लढाई नसून, आपल्या सर्वांच्या घटनात्मक अस्तित्वाच्या हक्कांची लढाई आहे. मी एक सामाजिक बांधव म्हणून आपणास विनंती करतो की, आपण आपल्यातील वैचारिक मतभेद बाजूला ठेऊन आपल्या कुटुंबासह आणि सहकाऱ्यांसह या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
आपल्या उपस्थितीने याआंदोलनाला बळ मिळेल आणि शासनावर दबाव निर्माण होईल. त्यामुळे संविधानिक गोंड गोवारी समाजाच्या या न्याय्य मागणीला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी, १८ सप्टेंबर रोजी नागपूर येथील आंदोलनात सहभागी होण्यासाठी कार्यकारी संयोजक विजय वाघाडे, तसेच तालुका संयोजक पुनिदास काळसर्पे, विजय चौधरी, वेंकट नेवारे, राकेश राऊत, मुन्ना राऊत, गोपाल शहारे, गणेश सोनावाने, किशोर चौधरी, रामभाऊ येसनसुरे, नरेश चौधरी, राकेश काळसर्पे, इंद्रपाल नेवारे, विलास राऊत, किशोर लसूनते, अरुण वघारे, योगेश मानकर यांनी आवाहन केले आहे.







